विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनावर जाहीरपणे टीका केल्याचा ठपका ठेवून अर्थशास्त्र विभागाचे संचालक प्रा. नीरज हातेकर यांच्यावर केलेली निलंबनाची तडकाफडकी कारवाई अंगलट आल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने आपल्या आणि संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकरिता आचारसंहिता लागू करण्याची नवी टूम काढली आहे.
प्रा. हातेकर यांच्यावरील कारवाईमुळे विद्यापीठाचीच प्रतिष्ठाच धुळीला मिळाली होती. विविध स्तरांतून या कारवाईला विरोध झाल्यानंतर विद्यापीठाला ही कारवाई मागे घेण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली होती. परंतु, या प्रकरणात आपले तोंड चांगले पोळल्यानंतर विद्यापीठाने प्राध्यापकांचा आवाज बंद करण्याची नवी शक्कल लढविली आहे.
मुळात विद्यापीठ कायद्यातच शिक्षकांसाठीच्या आचारसंहितेचा समावेश आहे. त्यामुळे ही नवी आचारसंहिता कशासाठी असा प्रश्न आहे. परंतु, विद्यापीठाने या करिता सात सदस्यांची एक स्वतंत्र समितीच नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत विद्यापीठाच्या डझनभर समितीवर काम केलेले आणि कुलगुरूंच्या खास वर्तुळात गणले जाणारे व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय शेटय़े यांच्याचकडे या समितीच्या निमंत्रक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे हे विशेष. पण, शिक्षकांच्या आचारसंहितेच्या नावाखाली त्यांच्या विचारस्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा तर हा डाव नाही ना, अशी शंका विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होते आहे.
मंगळवारच्या अधिसभा बैठकीत या संदर्भात सदस्य अंबादास मोहिते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना समिती नेमल्याची बाब समोर आली. अनेक प्राध्यापकांविरोधात तक्रारी आल्यामुळे ही आचारसंहिता लागू करण्याचा विचार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा