अवघ्या एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवून सुरळीत वाहतुकीसाठी मार्ग खुला करून देणाऱ्या नव्या काँक्रिट उपायाचे सादरीकरण शनिवारी एसीसी काँक्रिट कंपनीच्या वतीने करण्यात आले. बारा महिने २४ तास रहदारीने गजबजलेल्या रस्त्यांवर लवकर खड्डे पडतात आणि वाहतुकीच्या अखंड प्रवाहामुळेच त्याची दुरूस्ती करताना अनेक अडचणी उद्भवतात. या दुष्टचक्रातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने युटीडब्ल्यूटी-२४ आणि स्पीडक्रेट हे जलद काँक्रिट उपाय शोधले आहेत. या प्रकारात अवघ्या आठ तासात दुरूस्ती होऊन एका दिवसात रस्ता वाहतुकीस खुला होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने टेंभीनाका येथील वर्दळीच्या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर या नव्या उपायाची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान आज महापालिका आयुक्त आर.ए.राजीव, शहरातील बांधकाम व्यावसायिकांना कंपनीच्या आवारात या जलद काँक्रिटीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
भारतात एकूण ३.५ दशलक्ष किलोमिटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांबाबत अशाप्रकारे जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी काँक्रिटच्या रस्त्यांचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. या नव्या काँक्रिट उपायामुळे कमीत कमी वेळेत आणि किफायतशीर दरात रस्त्यांची दुरूस्ती होऊ शकेल, असा दावा कंपनी व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. सीमेंट, सुधारित पॉलिमर्स, खनिज आणि रासायनिक मिश्रणांपासून हे काँक्रिट तयार करण्यात आले आहे. कमीत कमी वेळात ते रस्त्यावर पसरले जाऊ शकते. त्यामुळे  शहरातील रस्त्यांप्रमाणेच महामार्ग, पुल, गोदी तसेच बंदर दुरूस्तीसाठी हे काँक्रिट उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हान्स फुचेस यांनी व्यक्त केला.  

Story img Loader