सायबर चोरटे रोज नव्या नव्या क्लुप्त्या काढून सामान्य नागरिकांना लुटतात. डीपफेक एआय अशा तंत्रज्ञानामुळे तर अशा घोटाळेबाजांचे आणखी फावत आहे. मुंबईच्या दहिसर येथील एका ५९ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी १.२ लाखांचा गंडा घातला. अलीकडे होणाऱ्या सायबर चोरीच्या तुलनेत हा आकडा खूप लहान वाटत असला तरी हा घोटाळा करताना चोरट्यांनी लढवलेली शक्काल कुणीही कल्पना केली नसेल अशी आहे. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना आणखी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. आपल्याला एखादा संशयास्पद फोन आल्यानंतर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याआधी थोडा विचार करावा, असेही पोलिसांकडून वारंवार सांगितले जात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय आहे?

दहिसर पूर्व येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मोबाइलवर एक फोन आला होता. फोनवर समोरून सीबीआय अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली गेली. पीडित महिलेच्या ३८ वर्षीय मुलाला सीबीआय अधिकाऱ्यांनी वांद्र्यातील कार्यालयात अटक केले असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर पीडित महिलेला धक्काच बसला. अटक करण्यामागचे कारण काय? असे विचारले असता समोरच्या व्यक्तीने सांगितले, “पाच महिन्यांपूर्वी तिचा मुलगा काही मित्रांसमवेत शहराबाहेर पार्टीसाठी गेले होते. तिथे त्याच्या मित्रांनी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून केला. तिचा मुलगा या गुन्ह्यात सामील नाही. मात्र तो त्याच्या मित्रांना वाचविण्यात सहभागी असल्यामुळे त्याला सहआरोपी केले आहे.”

डोंबिवली एमआयडीसीत शॉर्ट सर्किटमुळे डाईंग कंपनीला आग, सोशल मीडियावर पुन्हा स्फोट झाल्याच्या अफवा

तोतया सीबीआय अधिकाऱ्याने पुढे म्हटले, “आम्ही ही बातमी थोड्याच वेळात माध्यमांना देणार आहोत. जर बातमी माध्यमात जाण्यापासून थांबवायची असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.” हे ऐकल्यानंतर पीडित महिलेच्या पायाखालची वाळू सरकली महिलेला विश्वास बसावा यासाठी चोरट्यांनी तिच्या मुलाचा रडण्याचा आवाजही फोनवर ऐकवला. सदर आवाज डीपफेकद्वारे तयार केले असल्याचे नंतर समजले.

मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून पीडित महिलेला हा आपलाच मुलगा असल्याचे वाटले. त्यामुळे तोतया सीबीआयच्या लोकांना पैसे देण्याचे तिने मान्य केले. मात्र बँकेत फार पैसे नसल्याचेही तिने सांगितले. चोरट्यांच्या सांगण्यानुसार पीडित महिलेने १.२ लाख रुपये पाच वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविले. त्यानंतरही सायबर चोरटे आणखी पैशांची मागणी करू लागले. त्यामुळे पीडित महिलेने आपल्या मुलाच्या नंबरवर फोन केला आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आता रोबोट्सदेखील करू लागेल आत्महत्या? कोणत्या देशात घडली पहिली घटना? जाणून घ्या

पीडित महिलेने मुलाला फोन लावल्यानंतर कळले की, मुलगा कार्यालयात काम करतोय. तो सीबीआयच्या कोठडीत नसल्याचे समजल्यानंतर महिलेला हायसे वाटले, पण तोपर्यंत सायबर चोरट्यांनी लाखभर रुपये चोरले होते. यानंतर महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली आणि तक्रार नोंदविली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New cyber scam mumbai women hears son cry on call with cbi officer duped of one lakh rupees kvg
Show comments