विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या आग्रहामुळे नियमांवर काट; टीवायबीकॉमचा निकाल अनुभव नसलेल्या अध्यापकांकडून?
गैरप्रकारांना आळा घालण्याच्या नावाखाली वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांच्या (टीवायबीकॉम) तब्बल ८० हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पहिल्यांदाच ऑनलाइन मूल्यांकन करण्याचे मुंबई विद्यापीठाने ठरविले असले, तरी ही उत्तरपत्रिका तपासणीचा प्रयोग राबविणारी योजना पदार्पणातच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कारण ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्याच्या नादात खुद्द विद्यापीठाचेच पाऊल अनियमिततेच्या दिशेने पडू लागले आहे.
नेहमीच्या पेन किंवा पेन्सिलद्वारे मूल्यांकन करण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन स्कॅनिंग केलेल्या उत्तरपत्रिकांच्या डिजिटल प्रती संगणकावरच तपासली जाणार आहे. विद्यापीठाच्या या खटाटोपात सामील होण्याचे पात्रताधारक अध्यापकांनी अमान्य केले आहे. सध्या फक्त अभियांत्रिकी शाखेत ही योजना कार्यरत आहे. मात्र, अभियांत्रिकीच्या अध्यापकांना संगणकावर ३० ते ४० पृष्ठांची उत्तरपत्रिका तपासताना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणाला सामोरे जावे लागते आहे. हा अनुभव पाहता बुक्टू या प्राध्यापकांच्या संघटनेने वाणिज्यसह इतर शाखांना ही योजना लागू करण्याच्या कुलगुरू संजय देशमुख यांच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता अध्यापनाचा अवघा एक-दोन वर्षच नव्हे तर एक दिवसाचा अनुभव नसलेल्या नवअध्यापकांनाही घेऊन हे काम मार्गी लावण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे.
‘नियमाप्रमाणे तृतीय वर्षांच्या (टीवायबीकॉम-बीएस्सी-बीए आदी) उत्तरपत्रिका तपासण्याकरिता अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव अध्यापकाला हवा. पण, नियमित शिक्षक साथ देत नसल्याने अननुभवी अध्यापकांना मदतीला घेऊन हे काम मार्गी लावण्याचा दुष्पपरिणाम विद्यापीठाच्या मूल्यांकनाच्या दर्जावर होऊ शकतो,’ अशी भीती मुक्ता या महाविद्यालयीन अध्यापक संघटनेचे सचिव विलास आठवले यांनी व्यक्त केली.
ऑनलाइन तपासणीकरिता तंत्रसाहाय्य पुरविणारी कंपनीही विद्यापीठाने अद्याप नेमलेली नाही. त्याकरिता काढलेल्या निविदा प्रक्रियेत अवघ्या एका संस्थेने रस दाखविल्याने विद्यापीठाने निकष सैल करत २१ एप्रिलपर्यंत निविदांकरिता मुदत वाढवून दिली आहे. हे काम कोण करणार हेच निश्चित नसताना मूल्यांकनाकरिता अध्यापकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू करायचे ठरविले आहे. त्याकरिता २५ ते २८ एप्रिल दरम्यान विभागवार प्रशिक्षणही ठेवले आहे. या प्रशिक्षणाकरिता विद्यापीठाने ज्या ९००० हून अधिक शिक्षकांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे, त्यात अनेक अननुभवी अध्यापकांनाही समावेश आहे. यात अनेक अध्यापकांना पाच वर्षांचा तर सोडाच एक वर्षांचाही अनुभव नाही. काहींचा अनुभव तर शून्य दाखविण्यात आला आहे. कारण हे बहुतांश शिक्षक नुकतेच कंत्राटी, तासिका तत्त्वावर नेमलेले तात्पुरते अध्यापक आहेत. ज्यांच्याकडे अध्यापनाचाच पुरेसा अनुभव गाठीशी नाही, ते विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कशा तपासणार, असा प्रश्न आहे.
..तर सहा महिन्यात निकाल
वाणिज्य शाखेकरिता केवळ १५०० शिक्षक पात्रताधारक आहेत. त्यातील बहुतांश अध्यापकांचा ऑनलाइन मूल्यांकनाला विरोध आहे. ही व्यवस्था फार घाईघाईत राबविली जाते असा त्यांचा आक्षेप आहे. या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासायच्या ठरविल्या तर टीवायबीकॉमचा निकाल सहा महिन्यांनी लावण्याशिवाय गत्यंतर नसेल. त्यामुळे मिळतील त्या अध्यापकांकडून उत्तरपत्रिका तपासण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, अशी कबुली खुद्द परीक्षा विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. केवळ वाणिज्यचेच नव्हे तर इतरही विषयांचे यंदापासून ऑनलाइन मूल्यांकन केले जाणार आहे. ही बाब सध्याच्या घडीला तरी अशक्यप्राय दिसते आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.
प्राधान्य पात्रताधारक शिक्षकांनाच
प्रशिक्षणाकरिता तयार करण्यात आलेल्या अध्यापकांच्या यादीत अननुभवी अध्यापकांचा समावेश असला तरी मूल्यांकनाकरिता पहिले प्राधान्य पात्रताधारक शिक्षकांनाच देण्यात येईल, अशी मोघम प्रतिक्रिया परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली. मात्र अनुभवी किंवा पात्रताधारक शिक्षक फारच कमी असल्याने आणि त्यांनी ऑनलाइनला विरोध केल्याने दुसरे-तिसरे प्राधान्य अननुभवी शिक्षकांनाच द्यावे लागणार नाही का, या प्रश्नाचे उत्तर मात्र आपल्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे नुकसान?
या योजनेचा पहिला जबर फटका विद्यापीठाच्या सर्वात मोठय़ा संख्येच्या म्हणजे टीवायबीकॉमच्या ८० हजार विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. ही परीक्षा १६ एप्रिलला संपली. परंतु, ऑनलाइन मूल्यांकनाच्या खटाटोपात उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला अद्याप सुरुवात करता आलेली नाही. टीवायबीकॉमच्या दरवर्षी किमान ६ लाखांहून उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. त्या असतातही ३० ते ४० पृष्ठांच्या. इतक्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणार कधी आणि त्या प्राध्यापकांना तपासण्यास देणार कधी असा प्रश्न आहे.