मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. तरुण आणि पारदर्शी कारभाराचे उमेदवार विधानसभेला देण्यात येतील, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राज्यातील जनतेत राज्य सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. तो लोकसभा निवडणुकीत प्रकट झाला. विधानसभा निवडणुकीतही या रोषाचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते- पाटील, भास्कर भगरे हे खासदार हजर होते. सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे. त्यातून अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याचा दावा पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले. आमचे आमदार तिकडे गेले तरी लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल आमच्या बाजूने आहे. आमदार गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे पक्षाला फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले. पिपाणी चिन्हाला सरासरी ४५ ते ५० हजार मतदान झाले आहे. एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला १ लाख ३ हजार मते मिळाली. पिपाणीचा प्रचार तुतारी असा केला गेल्याने आम्हाला फटका बसला. पिपाणी चिन्हाविषयी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

रविवारी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक ९ जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. १० जून हा पक्षाचा स्थापना दिन अहमदनगर शहरात होणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात पक्षाची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New faces from sharad pawar group in assembly elections amy
Show comments