लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी सात ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेंबूर व अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालागत दोन अशी सात नवीन केंद्रे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग येथील केंद्रे पूर्णत्वास आली आहेत.

मुंबईत कुठेही आग लागली तर अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात ही मुंबई अग्निशमन दलाची एकेकाळची ख्याती होती. मात्र मुंबईतील लोकसंख्या आणि वसाहती, गाड्यांची संख्या वाढल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे अग्निशमन दलाची केंद्रे वाढण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून मुंबई महापालिकेने अग्निशमन दलाची केंद्रे वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अग्निशमन दलाची क्षमता व सुविधा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत ठाकूर व्हिलेज – कांदिवली (पूर्व),एल.बी.एस. मार्ग – कांजूरमार्ग (प.) या दोन्हीही ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कांदिवली केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. कांजूरमार्ग येथील काम पूर्ण होत आले आहे.त्याचबरोबर जूहू तारा रोड – सांताक्रुझ (प.), माहूल रोड-चेंबूर व टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

अग्निशमन दलाच्या दर्जोन्नतीसाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात २६१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सागरी किनारा मार्गालगत दोन ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. मरीन ड्राईव्ह ते वरळी अशा सागरी किनारा मार्गाचे ९५ टक्के पूर्ण झाले असून हा मार्ग नुकताच पूर्ण क्षमतेने सुरु केला आहे. या मार्गावर एखादी दुर्घटना झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देता यावी यासाठी पालिकेने सागरी किनारा मार्गालगत दोन अग्निशमन केंद्रे उभारण्याचे ठरवले आहे. त्यापैकी एक केंद्र वरळी परिसरात तर एक केंद्र प्रियदर्शीनी उद्यान परिसराच्या आसपास असेल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

स्टँडिंग फायर ऍडव्हायजरी कॉन्सिल’ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार

  • प्रत्येक १०.३६ चौरस किलोमीटर मागे एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे.
  • मुंबईत अग्निशमन दलाची ३४ अग्निशमन केंद्रे व १७ छोटी अग्निशमन केंद्रे यानुसार एकूण ५१ अग्निशमन केंद्रे आहेत.