शिधावाटप अधिकाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी साठेबाजीच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद शनिवारी मागे घेण्यात आला. मात्र या कारवाईचा निषेध करण्यासाठी सध्या आहे तो मालच विकणार असून सोमवारपासून नव्याने माल खरेदी करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या बंद आंदोलनामुळे किरकोळ बाजारात अन्नधान्याचे भाव पाच ते सहा रुपयांनी वाढले होते.
ठाणे शिधावाटप कार्यालयाने एक आठवडय़ापूर्वी नवी मुंबई एमआयडीसी भागात गोडाऊन घेऊन तांदूळ, गहू, आणि डाळीसह कडधान्य यांचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान २६ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला
होता.
दुकानाव्यतिरिक्त इतरत्र धान्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तशी सूचना शिधावाटप कार्यालयाला देणे क्रमप्राप्त असते. मात्र तशी माहिती न दिल्यामुळे शिधावाटप अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली होती. या कारवाईचा निषेध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उगारले होते. सरकारच्या वतीने या व्यापाऱ्यांनी तंबी देण्यात आल्याने ते सोमवारपासून घाऊक बाजार पुन्हा सुरू करणार आहेत. त्यामुळे आता आंदोलनाचा निर्णय मागे घेऊन सोमवारपासून नव्याने धान्य खरेदी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
एपीएमसीच्या धान्य बाजारात दिवसाला ४०० ते ४५० ट्रक भरून धान्य येते.  मात्र व्यापाऱ्याकडे जुना साठा आहे तो ते विकणार आहेत. व्यापाऱ्यांचा जप्त केलेला माल जोपर्यंत परत दिला जात नाही, तोपर्यत हे व्यापारी बाहेरून येणारा घाऊक माल खरेदी बंद आंदोलन सुरू ठेवले जाईल, अशी माहिती ग्रोमा या व्यापारी संघटनेचे पदाधिकारी जयंतीभाई रांभिया यांनी दिली.
व्यापाऱ्याकडे सध्या असणारा माल पुढील आठ दिवस विकला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तुटवडा झाल्यास किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाऊक बाजारातील गाळे छोटे पडत असल्याने व्यापारी हा माल इतरत्र साठवून ठेवतात, असे या साठेबाज व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या साठय़ाची रीतसर सूचना शिधावाटप कार्यालयाला देणे बंधनकारक असल्याचे शिधावटप अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघांच्या या भांडणात सर्वसामानान्य नागरिक मात्र महागाईने अधिक होरपळत आहे.   

Story img Loader