मुंबई : आयुष्यभराच्या कमाईतून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार काळजी घेतल्यास घर खरेदीदारांना संरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
संबंधित गृहनिर्माण प्रकल्प महारेराकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहेच. पण संबंधित प्रकल्पावर न्यायालयात खटले प्रलंबित आहेत का, असल्यास सद्यःस्थिती व तपशील, प्रकल्पावरील विविध तारण/कर्ज, प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी) किती मजल्यांसाठी जारी झाले आहे तसेच प्रकल्प मंजुरीच्या आराखड्यात संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या मंजुऱ्या याबाबत घरखरेदीदाराने प्रत्यक्ष व्यवहारापूर्वी खात्री करून घेणे अत्यावश्यक असल्याचे महारेराने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी करताना हा सर्व तपशील, पूरक कागदपत्रांसह देणे बंधनकारक केला आहे. संबंधित प्रकल्पाच्या महारेरा नोंदणी क्रमांकाच्या मदतीने महारेराच्या संकेतस्थळावर ( https://maharera.maharashtra.gov.in) सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
याशिवाय घरखरेदीदार आणि प्रवर्तक यांच्यातील घर विक्री करार आणि घर नोंदणी केल्याचे पत्र हे महारेराने प्रमाणित केलेल्या मसुद्यानुसारच द्यावे, असे बंधन प्रवर्तकांवर घातले आहे. घर खरेदी करारात दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार या बाबी अपरिवर्तनीय असल्याचे नमूद केले आहे. त्यात बदल करता येणार नाही. नोंदणी पत्र देताना सदनिका क्रमांक, चटईक्षेत्र, प्रकल्प पूर्णत्वाचा अपेक्षित दिनांक याचा तपशील नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवर्तकाने घर खरेदी करारात आणि नोंदणीपत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि सोयीसुविधांचा समग्र तपशील देणेही बंधनकारक केलेले आहे. यात पार्किंग आच्छादित, खुले, मेकॅनिकल, गॅरेज कसे राहील हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिवाय या पार्किंगची लांबी, रुंदी, उंची, प्रकल्पस्थळी पार्किंगची प्रत्यक्ष जागा हेही या जोडपत्रात नोंदवणे आवश्यक आहे.
प्रकल्पात आश्वासित केलेल्या विविध सोयी, सुविधा कधी उपलब्ध होणार, सोसायटीला कधी हस्तांतरित होणार हेही या जोडपत्रात नमूद करणे गरजेचे आहे. याशिवाय एकूण रकमेपैकी दहा टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी, घर नोंदणी करीत असल्यास प्रवर्तकाला घर विक्रीकरार करणे बंधनकारक आहे. करीत नसल्यास तुम्ही महारेराकडे तक्रार नोंदवू शकता. तसेच ज्यांच्यामार्फत हा व्यवहार करीत आहात, ते मध्यस्थ (दलाल) महारेरांकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींचीही खात्री घरखरेदीदारांनी घेणे आवश्यक असल्याचे महारेराने स्पष्ट केले आहे. या शिवाय विहित कालावधीत, विहित प्रपत्रात प्रकल्पाबाबत सद्यस्थिती दर्शवणारे अनुपालन अहवाल सादर न करणाऱ्या आणि प्रकल्प व्यापगत झाला तरी सद्यःस्थिती महारेरा संकेतस्थळावर अद्ययावत न करणाऱ्या प्रकल्पांची महारेरा नोंदणी स्थगित करण्यात येते. या प्रकल्पांची बँक खाती गोठवून त्यांचे एकूण व्यवहार थांबवण्यात येतात. या प्रकल्पांच्या याद्याही महारेरा संकेतस्थळावर दिलेल्या असतात. गुंतवणूकदारांनी या याद्याही तपासाव्यात, असे आवाहन महारेराने केले आहे.
हेही वाचा – टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे
भविष्यात उपस्थित होणाऱ्या अनेक शक्यतांबद्दल आधीच काळजी घेऊन महारेराने अनेक बाबी प्रवर्तकांना बंधनकारक केल्या आहेत. घरखरेदीदाराला कायदेशीर दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांनी सजगपणे या तरतुदींची पूर्तता प्रवर्तक करतात की नाही हे पाहावे, असे आवाहनही महारेराने केले आहे.
मार्गदर्शक सूचना …
- महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा
- संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून दिला जाणारा मंजुरीचा आराखडा, प्रारंभ प्रमाणपत्र, भूखंडाच्सा मालकीबाबत अहवाल, संबंधित प्रकल्पावर न्यायालयात खटले सुरू आहेत का? संबंधित प्रकल्पावर ‘बोजा’ आहे का? याची तपासणी बंधनकारक.
- पार्किंग व सेवा सुविधांच्या निर्धारित तपशीलासह महारेरा प्रमाणीकृत घर विक्रीकरार ,घर नोंदणीपत्र आहे का? या बाबींची महारेराच्या संकेतस्थळावरून खात्री करून घ्या.
सुरक्षित घर खरेदीसाठी हेही आवश्यकच
- महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक
- महारेराने ठरवून दिलेल्या “आदर्श घर खरेदी करारानुसारच” करार
- एकूण रकमेच्या दहा टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर खरेदी करत असाल तर विकासकाला घरविक्री करार करून देणे बंधनकारक
- महारेराकडे नोंदणीकृत मध्यस्थामार्फतच जागेचा व्यवहार