एसटी महामंडळाच्या बसेसना ऐतिहासिक नावे देण्याची परंपरा कायम ठेवत यापुढे सर्व निमआराम (एशियाड) गाडय़ांचे नामकरण ‘हिरकणी’ करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवछत्रपतींच्या काळातील ‘हिरकणी’ या धाडसी महिलेच्या मातृत्वाला महामंडळाच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या १७५०० बसेस असून त्यात साध्या, मिडी, निमआराम, वातानुकूलित गाडय़ांचा समावेश आहे. यातील वातानुकूलित गाडय़ा ‘शिवनेरी’ आणि ‘अश्वमेध’ या ऐतिहासिक नावांनी ओळखल्या जातात. साध्या गाडय़ांमध्ये बदल करण्यात आल्यावर त्या ‘परिवर्तन’ या नावाने परिचित झाल्या. ग्रामीण भागातील निमआराम वातानुकूलित गाडय़ा ‘शीतल’ या नावाने, तर मिडी बसेस ‘यशवंती’ या नावाने डोंगराळ आणि दुर्गम भागांत प्रवासी वाहतूक करू लागल्या. आता निमआराम किंवा एशियाड या नावाने ओळखल्या जाऊ लागलेल्या गाडय़ांचे ‘हिरकणी’ असे नामकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या ताफ्यात १३५० निमआराम गाडय़ा असून पुढील १५ दिवसांमध्ये या सर्व गाडय़ांवर नवे नाव दिसेल, असे कपूर यांनी सांगितले.

Story img Loader