मुंबईः ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जावेद आझमला न्यायालयाने २४ मर्चंपर्यंत कोठाडी सुनावली. जावेदने याप्रकरणातील अटक आरोपी उन्ननाथन अरूणाचलम याच्यामार्फत १८ कोटी रुपये स्वीकारले. तसेच अरुणाचलमला बिहारमध्ये लपण्यास मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपी एका राजकीय नेत्याचा भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जावेद आझम (४८) हा मालाडमधील रहिवासी आहे. तो इलेक्ट्रीक वस्तू वितरणाचा व्यवसाय करतो. यापूर्वी अटक आरोपी अरूणाचलम हा देखील इलेक्ट्रीक वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यामुळे तो जावेदच्या संपर्कात आला होता. मनोहर अरुणाचलम व उन्ननाथ अरूणाचलम या पिता-पुत्राने या गैरव्यवहारातील एकूण ३३ कोटी घेतले. मेहताने २०१९ मध्ये मनोहरला अंधेरी येथील कार्यालयात १८ कोटी दिले. ते १८ कोटी रुपये उन्ननाथ अरूणाचलमने आरोपी जावेदला दिले होते. तसेच अरुणाचलमला मिळालेले १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यातही जावेदचा सहभाग होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अरुणाचलमने जावेदशी संपर्क साधला होता. जावेदनेच बिहारमध्ये लपण्यास अरुणाचलमला मदत केली होती. जावेदचा सहभाग उघड झाल्यानंतर सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली. याशिवाय याप्रकरणात बँकेचा तत्कालीन सीईओ अभिमन्यू भोअन याला अटक करण्यात आली. नुकतीच याप्रकरणी चौथा आरोपी मनोहर अरूणाचलम, कपिल देढिया व उन्ननाथन अरूणाचलम यांना अटक करण्यात आली. याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू ते सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.

Story img Loader