मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील मुख्य आरोपी व बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याची मंगळवारी सुमारे अडीच तास लायडिटेक्टर चाचणी करण्यात आली. तपासाच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वाची मानली जाते. व्यवस्थापक म्हणून मेहताला या गैरव्यवहाराची संपूर्ण माहिती आहे. पण तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता याने इतर आरोपींसह कट रचून प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पण मेहता याबाबत कोणतेही सहकार्य करत नव्हता. अखेर याप्रकरणी मेहताची मंगळवारी पॉलिग्राफ (लायडिटेक्टर) चाचणी करण्यात आली. त्यात ४० ते ५० प्रश्न आरोपी मेहताना विचारण्यात आले. सुमारे अडीच तास ही पॉलिग्राफ चाचणी सुरू होती. त्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने तुरुंगातून मेहताला मंगळवारी सकाळी न्यायावैद्यक प्रयोगशाळेत नेण्यात आले होते.
कोट्यवधींचा व्यवहार…
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात मेहता आणि मनोहर उन्ननाथन अरुणाचलमचे काही व्यवहाराची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये २० लाखांचा व्यवहार थेट मनोहरच्या खात्यातून झाल्याचे आढळून आले. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून पैसे फिरविण्याचाही बनाव असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप मनोहरकडून कुठल्याही ट्रस्टची माहिती समजू शकली नाही. या पिता-पुत्राने एकूण ४० कोटी घेतले. त्यापैकी ७ कोटी मेहताला दिले होते. उर्वरित ३३ कोटी विविध मार्गाने वळविल्याचा संशय आहे. मनोहरने काही मित्रांना देखील पैसे पाठविल्याची माहिती उघड झाले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे. त्याच्या अनेक संशयास्पद व्यवहारांची तपासणी सुरू आहे. मेहताने २०१९ मध्ये मनोहरला १५ कोटी दिले. त्यानंतर १८ कोटी रुपये त्याच्या कार्यालयात स्वीकारल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच काही रक्कम मेहताच्या घरासाठी देखील दिल्याचे चौकशीत समजले होते. याशिवाय अपहाराच्या रक्कमेतील ७० कोटी रुपये मेहताने पौनला दिल्याचा संशय आहे. गैरव्यवहार सुरू असतानाही त्याच्याकडे कानाडोळा करणारे बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदर भोअन यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. तसेच याप्रकरणातील तत्कालीन अध्यक्ष हिरेन भानू यांना २६ कोटी व त्यांची पत्नी गौरी भानू यांना दोन कोटी रुपये मिळाल्याचे तपासात समजले आहे. त्याबाबतची पडताळणी या पॉलिग्राफ चाचणीत करण्यात आली.
कोणाविरोधात गुन्हा…
याप्रकरणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मेहताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला पोलिसांनी अटक केली. याशिवाय याप्रकरणात बँकेचा तत्कालीन सीईओ अभिमन्यू भोअन याला अटक करण्यात आली. नुकतीच याप्रकरणी चौथा आरोपी मनोहर अरूणाचलम याला अटक करण्यात आली. याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह आणखी एका व्यक्तीला आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस काढण्यात आल्या आहेत.