रिझर्व बँकेकडून मेहताच्या कबुलीजबाबाची ध्वनीचित्रफीत, पंचनामा पोलिसांना मिळाला

मुंबई : न्यू इंडिया को ऑप बँकेच्या १२२ कोटींच्या अपहाराप्रकरणी अटकेत असलेला महाव्यवस्थापक हितेश मेहता याने खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यास आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. त्यासाठी पुण्यातील नोंदणी कार्यालय व प्राप्तिकर विभागाशी मुंबई पोलिसांनी पत्र व्यवहार केला आहे. याशिवाय रिझर्व बँकेकडे मेहताने दिलेल्या कबुली जबाबचा व्हिडिओ आणि पंचनामा आर्थिक गुन्हे शाखेला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेहताकडून देण्यात आलेल्या माहितीत तफावत असल्याने या आठवड्यात त्याची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याबाबत अर्ज करणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले. मेहताच्या म्हणण्यानुसार त्याने १२२ कोटींपैकी ७० कोटी व्यावसायिक धर्मेश पौन तर ४० ते ५० कोटी अरुणभाईला दिल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात पौन यांनी फक्त १२ कोटी मिळाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, अरुणभाईला दिलेले पैसे दोन ट्रस्टच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट करण्यासाठी दिल्याचेही पोलिसांना सांगितले. त्या ट्रस्ट नेमक्या कुठल्या आहेत? त्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

प्राथमिक चौकशीत आरोपीने १५ कोटी व १८ कोटी रुपये अरूणभाईला दिल्याचे सांगितले आहे. अरुण भाईच्या अटकेनंतर या ट्रस्टचे गूढ उकलेल असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अरुणभाईचा शोध सुरू असून, त्याच्या चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मेहताने उर्वरित पैसे स्वतः च्या फायद्यासाठी वापरल्याचा संशय आहे. त्याच्या नावावर कुठे आणि किती मालमत्ता आहे? त्याची माहिती मिळवण्यासाठी पुण्याच्या नोंदणी कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.

तसेच प्राप्तिकर विभागाशीही पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यात मेहताच्या व्यवहारांची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. अपहाराप्रकरणी सनदी लेखापालाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याच्याकडून काही कागदपत्रे मागण्यात आली. ती देखील त्यांनी सादर करण्यात आली आहेत. या अपहारातील एक ते दोन कोटी रुपये माजी सीईओ अभिमन्यू भोअनला मिळाल्याचे मेहताना चौकशीत सांगितले आहे. त्याची पडताळणी सध्या सुरू आहे.

अपहार झालेल्या रकमेपैकी काही रक्कम ही हवालामार्फत बाहेर पाठवल्याची माहितीही समोर येत असून याबाबत तपास सुरू आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मेहतासह आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी मेहताने बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. बँकेतील इतर व्यक्तींच्या सहभागाबाबतही पोलीस तपास करत आहेत.