मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता याच्यापर्यंत गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये पोहीचल्याचा संशय आहे. तसेच या गैरव्यवहाराबाबत आरोपीने रिझर्व्ह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे कबुली दिली आहे. त्यांच्याविरोधात दादर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला होता. बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखाला वर्ग करण्यात आले असून याप्रकरणी ते पुढील तपास करणार आहेत.
हितेश मेहता याच्यापर्यंत गैरव्यवहारतील ७० कोटी रुपये पोहोचल्याचा संशय आहे. गेल्या २०२४ मध्ये आरोपींना २ कोटी रुपये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्याची पडताळणी सुरु आहे
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. बँकेच्या महाव्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (परिमंडळ-५) गणेश गावडे यांनी दिली. मेहता यांच्यासह त्यांच्या अज्ञात साथीदारांनीही फसवणूक मदत केल्याचा संशय आहे. २०२० पासून १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा गैरप्रकार सुरू होता, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणले. त्यामध्ये पुढील सहा महिन्यांसाठी नवीन कर्ज देण्यावर, नवीन ठेवी स्वीकारण्यावर किंवा पैसे काढण्याची परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयने बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ठेवीदारही चिंतीत झाले होते. १९६८ मध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना मुंबईत झाली. ५७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. स्थापनेपासूनच ही बँक देशातील विविध राज्यांमध्ये शाखांचे जाळे असलेली एक मजबूत आणि अनुसूचित बहुराज्य बँक झाली आहे. गेल्या चार दशकांच्या कामकाजात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकने अनेक टप्पे गाठले आहेत. मुंबई, ठाणे, सुरत आणि पुणे येथे बँकेच्या ३० शाखा सुरू आहेत. १ नोव्हेंबर १९९० रोजी बँकेला ‘शेड्युल्ड बँके’चा दर्जा मिळाला होता. पण आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर शुक्रवारी बँकेच्या कार्यालयांबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या सर्व शाखांबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या निर्बंधांनंतर शनिवारी बँकेतील तत्कालीन महाव्यवस्थापकावर १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.