मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील आरोपी कपिल देढियाला आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. गैरव्यवहारातील १२ कोटी रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला शनिवारी न्यायलयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही याप्रकरणातील पाचवी अटक आहे.

न्यू इंडिया को – ऑपरेटिव्ह बँकेतील अपहारातील रक्कम कपिल देढिया याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याला अटक करण्यात आली. वडोदरा येथे शोधमोहिम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला शनिवारी मुंबईत आणण्यात आले आणि सकाळी ११.३० वाजता औपचारिकपणे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलायने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

तपासानुसार, त्याच्या खात्यात अपहारातील १२ कोटी जमा करण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी मनोहर अरूणाचलम याच्या अटकेनंतर देढिया गायब झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके राजस्थान व गुजरातमध्ये पाठवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी त्याला वडोदरा येथे ताब्यात घेतले. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, बँकेचे सीईओ अभिमन्यू भोअन, मनोहर उन्ननाथन यांचा समावेश आहे.याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह देढियालाही आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. भानू दाम्पत्याने अपहारातील सुमारे २८ कोटी प्राप्त केल्याचा संशय असून ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तपासाअंती त्यांच्यावर टाच आणण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात मेहता आणि मनोहरच्या काही व्यवहारांची माहिती मिळाली होती. त्यामध्ये २० लाखांचा व्यवहारही निदर्शनास आला होता. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून पैसे फिरविण्याचाही बनाव असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अद्याप मनोहरकडून कुठल्याही ट्रस्टची माहिती देण्यात आलेली नाही. मनोहर व त्याचे वडील अरूणाचलम यांनी अपहारातील ४० कोटी घेतले. त्यापैकी ७ कोटी मेहताला दिले होते. उर्वरित ३३ कोटी विविध मार्गाने वळविल्याचा संशय आहे. मनोहरने काही मित्रांना पैसे पाठविल्याची माहिती मिळाली आहे. २०१९ मध्ये मेहताने मनोहरला १५ कोटी दिले. त्यानंतर १८ कोटी रुपये त्याच्या कार्यालयात स्वीकारल्याचेही तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader