झपाटय़ाने बदलणाऱ्या परिस्थितीतही नव्या भारताचे भवितव्य घडविणे शिक्षकांच्याच हाती आहे, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी शनिवारी संध्याकाळी येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना केले.
साक्षरतेच्या प्रसाराबरोबरच समाजाला सुसंस्कृत करण्याचे फार मोठे आव्हान शिक्षकांपुढे आहे. त्यासाठी थोडे चाकोरीबाहेर जाऊन नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारणाशिवाय समाज ही संकल्पनाच अपूर्ण असते. मग याच समाजाचा आरसा मानल्या गेलेल्या साहित्याच्या व्यासपीठावर अर्थ आणि राजकारण अवतरल्यावर आपण इतके हळवे का होतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.