मुंबई : समृद्धी महामार्गावरील कल्याण- आमणे-भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे- कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून या परिसरात नवे औद्योगिक केंद्र उभारले जाणार आहे़ या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जवाहरलाल नेहरू बंदर आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समृद्धी महामार्गावरील आमने नोड कामाचा आढावा बैठक पार पडली. शिक्षणमंत्री दादा भुसे, मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
ठाणे, रायगड, पालघर या भागाला आमने नोड जोडला जाणार असून भविष्यातील औद्याोगिक क्षेत्र म्हणून ते विकसित होणार आहे. या भागाचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. आमने नोड १० हजार ७९१ हेक्टर क्षेत्र असून त्या ठिकाणी इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टिक हब, कृषी हब, फूड प्रोसेसिंग पार्क आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. आमने नोडमुळे भविष्यातील वाढणारी वाहतूक लक्षात घेता नियोजन करण्याचे आदेश शिंदे यांनी या वेळी दिले. या भागातून जाणाऱ्या नाशिक महामार्गाचे काम वेळेत आणि पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना देतानाच वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंकचे काम ९५ टक्के पूर्ण
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. सुमारे १३.३० किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकच्या दोन टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीच्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासात अजून २० ते २५ मिनिटांची बचत होणार असून त्याचे काम करताना कुठलीही तडजोड करू नका. उंचीवरील काम करताना अधिक काळजीपूर्वक करा. कामाची प्रत्येक पातळीवर चाचणी करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.