एका लोकलमधील प्रवासी संख्या ३३६ने वाढणार
उपनगरीय लोकलमध्ये चढल्यावर तुम्हाला आसन व्यवस्थेत बदल दिसेल.. काही डब्यांमधील दरवाजाजवळची तीन आसनेच नसतील तर काही डब्यांतील आसन व्यवस्था मेट्रोसारखी असेल. उपनगरीय लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी उपाय म्हणून लोकल डब्यांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार तयार करण्यात आलेले डबे कल्याण ते मुंबई सीएसटीदरम्यान येत्या शुक्रवारी धावणार आहेत.
नवी आसन व्यवस्था असलेल्या लोकलमधील १, ६, ९ आणि १० या डब्यांमधील दरवाजांजवळचे तीन आसन क्षमता असलेले बाकडे काढून त्या जागी प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मोकळी केली आहे. प्रवाशांना उभे राहण्यासाठी त्यानुसार हॅण्डलची रचना केली आहे. यामुळे एका डब्यातील २४ आसने कमी होत असले तरी, त्याऐवजी ५६ प्रवाशांची उभे राहण्याची सोय होणार आहे. याशिवाय लोकलच्या चौथ्या डब्यात मेट्रो पद्धतीच्या आसन व्यवस्थेनुसार खिडकीजवळ आडव्या रचनेत आसने बसवून मधली मोकळी जागा प्रवाशांना उभे राहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे यात ११२ प्रवासी उभे राहू शकणार आहेत. हा प्रयोग फक्त द्वितीय श्रेणीच्या सामान्य डब्यांमध्ये केला जाणार आहे. आसन व्यवस्थेतील बदलांमुळे नेहमीपेक्षा ३३६ जास्तीच्या प्रवाशांची क्षमता निर्माण होणार आहे. मात्र महिला, अपंग, मालडबा, पहिल्या श्रेणीच्या डब्यांमध्ये सध्या कुठलाही बदल केला जाणार नाही. माटुंगा कारखान्यातून ही लोकल तांत्रिक तपासासाठी कुर्ला कारखान्यात नेण्यात येणार आहे. याबरोबरच लोकलच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण म्हणून दरवाजाबाहेरील वरच्या बाजूला असलेले व्ॉलिगेटर काढण्यात आले आहे. ही लोकल प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार असून सात दिवसांच्या कालावधीत प्रवाशांकडून आसन व्यवस्थेच्या बदलाबाबत प्रतिक्रिया मागवण्यात येतील. याचा अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केला जाईल व आसन रचनेतील बदल कायम ठेवण्यावर निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
नव्या डब्यांची लोकल २५ डिसेंबरला रूळावर
उपनगरीय लोकलमध्ये चढल्यावर तुम्हाला आसन व्यवस्थेत बदल दिसेल..
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-12-2015 at 04:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New local train to run on 25 december in mumbai