पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या ताफ्यात लवकरच आणखी चार नव्या गाडय़ा सामील होणार आहेत. यामुळे डहाणूपर्यंत उपनगरी सेवा मार्च अखेर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या ताफ्यात डिसेंबरमध्ये तीन, तर जानेवारीत एक गाडी येणार असून, बोरिवली ते विरार दरम्यानच्या फेऱ्या वाढविण्यासाठी या गाडय़ांचा प्राधान्याने वापर करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार यांनी दिली. आणखी गाडय़ा पुढील दोन महिन्यात उपलब्ध झाल्या तरच डहाणू गाडी सुरू करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई ते दिल्ली दरम्यान आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी स्थानकांवर लावण्यात आलेली कूपन व्हॅलिडेटिंग यंत्रे बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एटीव्हीएम मशीन्ससाठी असलेले सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून लवकरच ते केंद्रीय तिकीट यंत्रणेशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे त्यात सीझन पास, प्लॅटफॉर्म तिकीट आदींसारखे अधिक पर्याय सुरू होऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले. लवकरच आणखी ५८७ मशीन्स लावण्यात येणार असून सध्या पश्चिम रेल्वेवर ४५० सीव्हीएम तर ६५० एटीव्हीएम मशीन्स सुरू आहेत.    

Story img Loader