मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान कोणताही नवा चित्रपट असो वा टीव्हीसाठीचा कार्यक्रम असो, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणतो. परंतु, शक्यतो आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही याची काळजी अन्य कोणत्याही अभिनेत्याप्रमाणे आमिर खानही घेतच असतो. सर्वसाधारणपणे अतिरिक्त मुखवटा अथवा चित्रविचित्र ‘गेटअप’मध्ये तो फारसा चित्रपटातून दिसलेला नाही. परंतु, आता एका नव्या जाहिरातीत मात्र आमिर खानने आपल्या प्रतिमेला छेद जाईल असे रूप धारण केले आहे. आमिर खान चक्क एका स्त्री व्यक्तिरेखेद्वारे जाहिरातींमधून झळकणार आहे.
या छायाचित्रात आमिर खानची ही नवीन प्रतिमा टीव्हीवरच्या जाहिरातींमधून एप्रिलमध्ये पाहायला मिळेल. ‘जिंदगी मुस्कुराये’ अशी टॅगलाईन असलेल्या या जाहिरातीद्वारे आमिर खान लोकांसमोर येणार असून याबाबतचा तपशील आणि कोणत्या उत्पादनाची जाहिरात तो करतोय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाचा एक भाग झाल्यानंतर पुढल्या भागात आमिर खान कोणता विषय मांडणार आहे याबाबत जशी गुप्तता राखण्यात आली होती. त्याचप्रमाणे ही नवी जाहिरात कोणत्या उत्पादनाची आहे की एखाद्या कार्यक्रमाची आहे ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र स्त्री व्यक्तिरेखेत आमिर खान आहे एवढेच जाहीर करण्यात आले आहे.

Story img Loader