निवडणुका जवळ आल्यावर संभ्रमाचे वातावरण तयार करण्याची राष्ट्रवादीची खासियत आहे. यातूनच शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचे तुणतुणे वाजविण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली आहे. तर अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा बोलून दाखविली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या नावावर मतैक्य झाल्यास ते नक्कीच पद स्वीकारतील, असे विधान करून पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादीने पंतप्रधानपदाकरिता पवार यांच्या नावाची चर्चा सुरू केली होती. पटेल यांनी पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांच्या नावाची पंतप्रधानपदाकरिता चर्चा सुरू करण्यात आली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे सुतोवाच केले.  २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्यात चूक झाली, अशी खंत अजित पवार नेहमीच बोलून दाखवितात. यावेळी सर्वाधिक जागा मिळाल्यास राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदावर दावा करेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उडी मोठी असणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसबरोबर आघाडीत जास्त जागा मिळाव्यात, अशी चर्चा राष्ट्रवादीने आतापासूनच सुरू केली आहे. देशाचे पंतप्रधानपद आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीचे स्वप्न असले तरी ते साध्य करणे राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान असेल.  गेल्या वेळी पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीने सुरू केली होती, पण निवडणुकीत पक्षाची मोठय़ा प्रमाणावर पीछेहाट झाली होती.