महापालिकेत समाविष्ट होण्यास संघटित विरोध करून आतापर्यंत ग्रामपंचायत जपणाऱ्या ५५ गावांची, नागरीकरणाच्या वेगात नागरी सुविधा पुरविताना तसेच अतिक्रमणे रोखताना दमछाक होत असल्याने आता या गावांची एकत्र मोट बांधून नवी महापालिकाच स्थापण्याचा घाट नगरविकास विभागाने घातला आहे. ही महापालिका अस्तित्वात आली तर अंबरनाथ, कल्याण आणि ठाणे या तीन तालुक्यांमध्ये या महापालिकेची हद्द राहील.
या प्रस्तावित महापालिकेत कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेली २६, नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली १४ आणि आता ठाणे महापालिकेत असणारी १५ अशा एकूण ५५ गावांचा समावेश असेल. २००१ च्या जनगणनेनुसार या सर्व गावांची लोकसंख्या १ लाख ८९ हजार ६०५ होती. मात्र गेल्या बारा वर्षांत ती चार लाखांच्या घरात आहे.
महापालिका प्रशासन नाकारले तरी ही गावे नागरीकरणाचा रेटा थोपवू शकली नाहीत. वाढत्या लोकसंख्येस नागरी सुविधा पुरविण्यात बहुतेक ग्रामपंचायती असमर्थ ठरल्या आहेत. महापालिकेतून वगळल्यानंतर या भागांतील नियोजन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे असले तरी येथे मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकलेला नाही. कारण ही सर्व गावे शहरांलगत आहेत. त्यामुळे एका स्वतंत्र महापालिकेद्वारे त्यांचा कारभार यथायोग्य होईल, असे नगरविकास खात्याचे मत आहे. १९८२ पर्यंत ठाणे जिल्ह्य़ात एकही महापालिका अस्तित्वात नव्हती. त्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी १९८३ ला कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना झाली. पुढील काळात नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका टप्प्याटप्प्याने कार्यान्वित झाल्या.
जिल्ह्य़ातील या सर्वच महापालिकांमध्ये समाविष्ट होण्यास परिसरातील गावांनी विरोध केला. मात्र याबाबतीत कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका सर्वाधिक वादग्रस्त ठरल्या. उल्हासनगर वगळून अंबरनाथ आणि बदलापूरचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश केल्याने या परिसरातील नागरिकांनी सनदशीर मार्गाने लढा दिला. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे महापालिकेतून वगळण्यात आली. पुढे कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांनी कल्याण महापालिकेविरुद्ध बंड पुकारले. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील १४ गावांनीही महापालिका प्रशासन नाकारले. त्यांनी सातत्याने एकजुटीने सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याने ही गावे त्या महापालिकांतून वगळली गेली. ठाण्यातील १५ गावांनीही वारंवार ‘महापालिका नको’ अशी भूमिका घेतली आहे.
प्रस्तावित महापालिकेतील गावे
१ ) नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली गावे- दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नाचाली, वाकळण, बामाळी, नारिवली, बाळे, नागांव, भंडार्ली, उत्तरशिव आणि गोठेघर (२००१ची लोकसंख्या-१२ हजार ७३०)
२) कल्याण तालुक्यातील गावे- घेसर, हेदुटणे, पिसवली, नांदिवली तर्फे अंबरनाथ, दावडी, गोळवली, सोनारपाडा, माणगांव, कोळे, निळजे, काटई, उसरघर, घारीवली, संदप, भोपर, नांदिवली तर्फे पाचानंद, आसदे आणि सागांव (२००१ ची लोकसंख्या-१ लाख १२ हजार ९६१)
३)अंबरनाथ तालुक्यातील गावे- आडीवली-ढोकळी, उंबरोली, भाल, द्वारली, वसार, चिंचपाडा, आशेळे आणि माणेर (२००१ ची लोकसंख्या- ३३ हजार २५१)
४) ठाणे महापालिकेतील गावे- आगासन, बेतवडे, दातिवली, डावले, डायघर, देसाई, दिवा, डोमखार, खिडकाळी, पडले, साबे, सांगर्ली, शीळ, सोनखार आणि म्हातार्डी (२००१ ची लोकसंख्या- ३० हजार ६६३). तब्बल दहा वर्षांपूर्वी पालिकेच्या महासभेत ही गावे वगळण्याबाबत बहुमताने ठराव संमत झालेला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा