इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : नरिमन पॉईंट परिसरात तुम्हाला येत्या महिन्याभरात पाणी विकणारी एक फिरती गाडी दिसू शकेल. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांना पर्याय म्हणून धातूच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विकण्याचा हा नवीन ‘स्टार्ट अप’ एक संस्थेने सुरू केला आहे. पालिकेच्या परवानगीने प्रायोगिक तत्त्वावर नरिमन पॉईंट परिसरात हा उपक्रम सुरू झाला आहे. क्यू आर कोड असलेल्या धातूच्या बाटल्यांमधून हे पाणी उपलब्ध होणार आहे. पर्यावरणाला प्लास्टिकपासून असलेला धोका कमी करण्यासाठी पुनर्वापर या तत्वावर हा नवीन स्टार्ट अप सुरू करण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या हल्ली सर्वत्र उपलब्ध असतात. मुंबईकर तहान लागल्यानंतर १५ ते २० रुपयांची पाण्याची बाटली खरेदी करतात आणि पाणी संपल्यानंतर ती फेकून देतात. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र या बाटल्या घेतल्यानंतर पाणी संपले की ते भरून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल याची खात्री नसते. तसेच काचेची बाटली बाळगळणे शक्य नसते. नोकरदार मंडळी आपली पाण्याची बाटली सोबत घेऊन फिरतात आणि त्यांना ती कार्यालयात पुन्हा भरून घेता येते. मात्र फिरतीच्या स्वरुपाचे काम करणारे नागरिक किंवा पर्यटकांना मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी विकत घ्यावे लागते. या सगळ्याला पर्यावरणपूरक पर्याय देण्याचा नवीन अनोखा उपक्रम ॲपलअर्थ या स्टार्ट अपअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. धातूच्या बाटल्यांमधून पाणी देण्यासाठी आणि या बाटल्या पुन्हा कमी दरात भरून घेता येतील अशी एक नवीन योजना या संस्थेने आणली आहे. पालिकेच्या ए विभागाच्या परवानगीने नरिमन पॉईंट ते चर्चगेट परिसरात ही पाणी विकणारी गाडी महिन्याभरासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

आणखी वाचा-रजोनिवृत्तीबाबतच्या जागरूतीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, ९१ टक्के पुरुषांचे मत

यासंदर्भात बोलताना संस्थेच्या अर्पिता कलानुरिया यांनी सांगितले की, भारत रियुज या उपक्रमांतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ९९ रुपयांना ग्राहकाला एक धातूची बाटली आणि दिवसभरात पाच लिटर पाणी पुन्हा भरून घेण्याची सोय देतो. हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबईत २५ ते ३० ठिकाणी ही गाडी सुरू करण्याचा आमचा विचार आहे. या धातूच्या बाटलीवर क्यू आर कोड असून त्यावर तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळते. त्यात तुम्ही किती पाणी आतापर्यंत घेतले याची माहिती मिळते. ही बाटली तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. तसेच मोबाइल रिचार्जप्रमाणे याचे आगाऊ पैसे भरून दिवसभर कुठेही पाणी भरून घेता येईल, असा हा उपक्रम आहे. नको असेल तेव्हा ही बाटली त्याच गाडीवर परत दिल्यास त्याचे ५९ रुपये तुम्हाला परतही मिळतात. या बाटल्या निर्जंतुक करून पुन्हा वापरात आणल्या जातील, असेही अर्पिता यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी संस्थेने बिसलेरी या कंपनीशी करार केला आहे. येत्या १ जानेवारीपर्यंत ही पाणी विकणारी गाडी नरिमनपॉईंट परिसरात असेल आणि मोफत पाणी देणार आहे.

ज्यांच्याकडे स्वतःची धातूची किंवा काचेची बाटली आहे त्यांनाही या गाडीवर पाच रुपयात पाणी भरून घेता येणार आहे. फक्त प्लास्टिकची बाटली असणाऱ्यांना पाणी भरून घेण्याची परवानगी नसेल, अशी माहीती अर्पिता यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New option for drinking water in nariman point area mumbai print news mrj