विनायक डिगे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई परिसरात गालगुंड या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. शिवाय काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या श्रवणयंत्रणेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एरवी लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार प्रौढांनाही होत असल्याचे समोर आले आहे. विषाणूचे परिवर्तन (म्युटेशन) झाल्यामुळे आजाराची लक्षणे तसेच परिणाम बदलल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हेही वाचा >>> ओबीसी विद्यार्थ्यांना ६० हजारांपर्यंत अर्थसाहाय्य; राज्य सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना

हिवाळयात नेहमीच संसर्गजन्य आजार बळावतात. या कालावधीत गालगुंडाचे दोन-तीन रुग्ण आढळून येतात. मात्र गेल्या २० दिवसांमध्ये शहरात गालगुंडचे सात ते आठ रुग्ण आल्याची तज्ज्ञांनी दिली. काहीवेळा दिवसाला १० रुग्णही येत आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तींचाही समावेश असून सहव्याधी असलेल्यांना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गजन्य आजाराचे विषाणू प्रबळ होतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता असते. गालगुंडच्या विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याचा हा परिणाम असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागातील सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी सांगितले. काही रुग्णांना कानात शिट्टी वाजविल्याचा भास होऊन ऐकू येणे बंद होते. यापूर्वी एखाद्याच रुग्णाला कानाचा त्रास होत असे. मात्र यावेळी अनेक रुग्णांनी कान दुखणे, कमी ऐकू येणे अशा तक्रारी केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कानाचा त्रास सुरू झाल्यानंतर ४८ ते ७२ तासांत योग्य उपचार न केल्यास नस बाधित होऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका उद्भवू शकतो, असे डॉ. जुवेकर यांनी सांगितले. मुंबईप्रमाणेच नालासोपारा, वसई विरार या भागांतही गालगुंडचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत. करोनाकाळात इतर रोगांच्या लसीकरणावर परिणाम झाल्यामुळे अन्य संसर्गजन्य आजार बळावत असल्याची शक्यताही काही तज्ज्ञांनी बोलून दाखविली.

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या एमएमआर लसीमुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. परिणामी, तरुण, मध्यम व ज्येष्ठ नागरिकांना गालगुंड होत नाही. मात्र यावेळी मध्यम वयोगटातील रुग्णही सापडत आहेत. गालगुंड बरे होण्याच्या कालावधीतही वाढ झाली आहे.

– डॉ. धीरजकुमार नेमाडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, भाभा रुग्णालय

काय काळजी घ्याल ?

– गालाखाली गरम पाण्याचा शेक द्या

– गालगुंड झालेल्या जागी हलका मसाज करा

– डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या

– मधूमेह, रक्तदाब असल्यास विशेष काळजी घ्या

– कानामध्ये शिट्टीसारखा आवाज येत असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा

– संसर्गजन्य आजार असल्याने गालगुंड झाल्यास मुलांना शाळेत पाठवू नका

लक्षणांमध्ये बदल..

पूर्वी                                      आता

गळयाखाली सूज, ताप                सर्दी, खोकला झाल्यावर दोन दिवसांनी सूज

दोन्ही बाजूला एकाच वेळी सूज                प्रथम एका व २-३ दिवसांनी दुसऱ्या बाजूला सूज

पाच दिवसांत रोगावर मात                   मुलांना बरे होण्यास ८-१० दिवस, प्रौढांना ७ दिवस

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New outbreak of mumps risk of hearing loss zws
Show comments