मात्र जुन्या केंद्रांची अवस्था बिकट
अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांशी झगडत असलेल्या रुग्णांची शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा काळजी घेण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली परिहार (पॅलिएटिव्ह केअर) सेवेची सुविधा सध्या सलाइनवर असताना राज्य सरकारने नव्याने नऊ केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलेला आहे.
दुर्धर आजारांनी वेढलेल्या रुग्णांना आणि पर्यायाने नातेवाईकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर धोरणाअंतर्गत २०१४ साली अमरावती, सातारा, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वाशिम आणि नंदुरबार या आठ ठिकाणी पॅलिएटिव्ह केंद्रे सुरू केली. ही केंद्रे स्थापित होऊन चार वर्षे झाली तरी डॉक्टर- समुपदेशकांची रिक्त पदे, औषधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांमुळे ही केंद्रे नावापुरती सुरू आहेत.
सध्या आठपैकी पाच केंद्रांवर डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर पाच परिचारिकांची पदे रिक्तआहेत. तसेच समुपदेशकांचीही जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत. केंद्रावरील डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. वेतन परवडत नसल्याने केंद्रावर नेमण्यात आलेले बहुतांश डॉक्टर सोडून जातात. त्यामुळे प्रत्यक्षात तपासणी आणि औषधे देण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना केवळ परिचारिकांकडून सेवा दिली जाते. दुर्धर आजारांमध्ये अनेकदा रुग्णांना अत्यंत वेदना होत असल्याने वेदनाशामक औषधे दिली जातात. आठपैकी की केवळ एकाच केंद्राकडे ही औषधे देण्याचा परवाना आहे. त्यामुळे औषधे आणि डॉक्टरांची या केंद्रावर वानवाच असल्याचे पॅलिएटिव्ह केअर केंद्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पॅलिएटिव्ह केंद्रामधील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण टाटा मेमोरिएल रुग्णालयाकडून अनेकदा करण्यात आले आहे. मात्र कंत्राटी तत्त्वावर असलेले डॉक्टर वारंवार बदलत असल्याने अप्रशिक्षित डॉक्टरांकडून बऱ्याचदा कर्करोग, पक्षाघात किंवा क्षयरोगाच्या रुग्णांना उपचार दिले जातात. परिणामी, या केंद्राकडून रुग्णांचा पाठपुरावा योग्यरीतीने केला जात नाही. दरवेळेस आम्ही प्रशिक्षणाची मेहनत घेतो, मात्र त्याचा अपेक्षित परिणामच दिसत नाही, असे टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या पॅलिएटिव्ह केअर विभागाच्या प्रमुख डॉ. मेरी मुकादेन यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या पॅलिएटिव्ह केअरची अवस्था बिकट असताना राज्य सरकारने अजून नऊ नव्या केंद्रांसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. एकीकडे दिले जाणारे वेतन परवडत नसल्याने या केंद्रामध्ये डॉक्टर टिकत नाहीत आणि दुसरीकडे नव्या केंद्राच्या उभारणीची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे, असे केंद्रामधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पॅलिएटिव्ह केअरसाठी केरळनंतर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर कर्नाटक सरकारने ही सुविधा सुरू केली. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कर्नाटक सरकारने ही सुविधा अत्यंत चांगल्याप्रकारे राबविली आहे. प्रायोगिक टप्प्यावरील आठ केंद्रांनंतर गेल्या चार वर्षांमध्ये राज्य सरकारने खरंतर राज्यभरामध्ये ही सुविधा सुरू करणे अपेक्षित होते, असेही डॉ. मुकादेन यांनी पुढे सांगितले.
मनुष्यबळ उपलब्ध करणे कठीण
या केंद्रासाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे कठीण होत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. नव्याने सुरू करण्यात येणारी केंद्रे ही जिल्हा रुग्णालयांमध्येच असणार असून उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच चालविण्यात येईल. केंद्राकडून या प्रस्तावास मजुंरी मिळाल्यास पॅलिएटिव्ह केअरसाठी लागणारी साधने आणि औषधे उपलब्ध करण्यास मदत होईल, असे आरोग्य संचलनालयाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.
सुविधा
- रुग्णाची औषधे, जखमेची मलमपट्टी, आहार, शारीरिक स्वच्छता आदी बाबत नातेवाईकांना मार्गदर्शन करणे.
- रुग्णाला वेदनात्मक त्रास कमी होण्यासाठी मदत करणे
- समुपदेशकामार्फत रुग्णाला आणि नातेवाईकांना होणारा मानसिक ताण दूर करणे
- आजाराशी झगडण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांचे मनोबल वाढविणे