दहा दिवसांपूर्वी रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव; लोकलचा प्रवास सुखकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट तयार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव दहा दिवसांपूर्वीच रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. प्रस्तावानुसार चार फलाट बांधण्यात येतील. यासाठी ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मोठय़ा प्रमाणात मेल-एक्स्प्रेस सोडण्यात येतात. मात्र दिवसेंदिवस भार वाढत जात असल्याने मेल-एक्स्प्रेससाठी मध्य रेल्वेकडून कुर्ला ते सीएसएमटी पाचवा-सहावा मार्ग केला जात आहे. मध्य रेल्वेकडून या नियोजनाबरोबरच लांब पल्ल्यांसाठी स्वतंत्र फलाट आणि टर्मिनस उभारण्याचेही नियोजन आहे. यातील पनवेल टर्मिनस आकारास येत असून लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मुंबईत परेल टर्मिनसचाही प्रस्ताव आहे. हा प्रस्तावही नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. यांनतर आता मध्य रेल्वेकडून कल्याण स्थानकातही लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. कल्याण स्थानकाच्या पूर्वेला मालवाहतूक गाडय़ांसाठी असलेल्या राखीव जागेवरच चार फलाट बांधण्यात येतील. प्रकल्प मंजूर होताच साधारण तीन ते चार वर्षांत त्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला १,६८८ लोकल फेऱ्या होतात. तर २०० पेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाडय़ाही धावतात. काही लोकल फेऱ्यांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे लेटमार्क लागतो. कल्याणपासून सीएसटीपर्यंत मेल-एक्स्प्रेस येताच त्यांच्यासाठी जलद लोकल थांबविल्या जातात. त्याचा परिणाम जलद लोकलच्या वेळापत्रकावर होतो आणि त्या उशिराने धावतात. कल्याण स्थानकात तर सध्या सात फलाट असून यातील दोन आणि तीन, चार व पाच तसेच सहा व सात नंबर फलाट हे सामायिक आहेत. यातील चार व पाच आणि सहा व सात नंबर फलाटांवर लांब पल्ल्याच्या गाडय़ा येतात. तर पाच नंबर फलाटावरून सीएसएमटीला आणि चार नंबर फलाटांवर खोपोली, कसारासाठी जलद लोकलही धावतात. तर एका फलाटातून फक्त कल्याण स्थानकातून लोकल सुटतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट बांधल्याने लोकल प्रवास सुकर होईल आणि त्या स्थानकातून पुढे मार्गस्थ करण्यास कोणत्या अडचणीही येणार नसल्याचे सांगण्यात आले.