पोलीस निरीक्षक पदांपर्यंतच्या बदल्याचे अधिकार जिल्हास्तरावरील जिल्हा पोलीस आस्थापना मंडळास देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमात महत्त्वाच्या सुधारणा करून बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
पोलीस अधिनियमातील सुधारणांमुळे जिल्हास्तरासह राज्य पोलीस दलातील विशेष यंत्रणांच्या स्तरावर पोलीस आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे त्यास्तरावरील बदल्याचे अधिकार देण्यात येतील.
जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असेल. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) हे या मंडळाचे सदस्य असतील. विशेष यंत्रणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळावर संबंधित यंत्रणेचे प्रमुख हे अध्यक्ष असतील, तर या विशेष यंत्रणेतील तीन ज्येष्ठ अधिकारी सदस्य असतील.
पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या सर्वसाधारण तसेच मुदतपूर्व बदल्यांचे अधिकार या पोलीस आस्थापना मंडळांना असतील. त्याचप्रमाणे संबंधित जिल्हा किंवा विशेष पोलीस यंत्रणेच्या बाहेर पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या करण्याची शिफारस पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक – दोनला करण्याचे अधिकारही या आस्थापना मंडळांना आहेत.