मुंबई : भारतातील वैद्यकीय पर्यटनामध्ये (मेडिकल टुरिझम) गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून राष्ट्रीय पातळीवर याचा विस्तार करण्याची योजना केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मेडिकल टुरिझमचा विस्तार करण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्यात येत आहे. आगामी महिनाभरात हे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
हे धोरण तयार करताना परवडणाऱ्या किंमतीत जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच परदेशातून येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उपचारानंतर मुंबई व महाराष्ट्रात पर्यटन सहली घडवून आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रुग्ण विमानतळावर उतरल्यापासून ते परत जाईपर्यंतचा विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे.
परवडणाऱ्या किंमतीत जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल डॉक्टरांमुळे भारत हा आज जागतिक वैद्यकीय पर्यटनाचा प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. विशेषतः कोरोनानंतरही या क्षेत्राने आपली पकड कायम ठेवली असली तरी त्याला व्यावसायिक रुप देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांमध्ये मेडिकल टुरिझम (वैद्यकीय पर्यटन) वाढवण्याचा निर्णय आहे. यात सरकार खासगी क्षेत्राच्या सहकार्याने भारतातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करणार आहे. जागतिक वैद्यकीय पर्यटनाचा विचार करता भारताचा वैद्यकीय पर्यटन व्यवसाय सुमारे नऊ अब्ज डॉलर इतका असून जागतिक वैद्यकीय पर्यटन निर्देशांकात भारत १० व्या स्थानावर आहे.
सुमारे ७८ देशांमधून दरवर्षी सुमारे २० लाख रुग्ण भारतात उपचारासाठी येतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारताला उपलब्ध होतो. वैद्यकीय पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळतानाच देशातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विकास होतो. तसेच परदेशी रुग्णांना आकर्षित करणाऱ्या रोबोटिक शस्त्रक्रिया, एआय-आधारित निदान प्रणाली आणि टेलीमेडिसिन यासारख्या तंत्रज्ञानाला चालना मिळते. रुग्णालये, विशेष उपचार केंद्रे आणि संशोधन प्रयोगशाळांचा विस्तार होतो. मेडिकल टुरिझममुळे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, हॉटेल कर्मचारी, अनुवादक, ट्रॅव्हल एजंट, अँब्युलन्स सेवा आणि वैद्यकीय वाहतूक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतातील वैद्यकीय पर्यटन हे २०२७ पर्यंत १८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असून जगभरातील रुग्ण भारतातील किफायतशीर व गुणवत्तापूर्ण उपचारांसाठी आकर्षित करण्याकरता पद्धतशीरपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. २०२३ च्या अखेरीस भारतात आलेल्या वैद्यकीय पर्यटकांची संख्या पाच लाखांपेक्षा वाढून २०२४-२५ मध्ये सुमारे २० लाख एवढी झाली. यात बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, इराक, नायजेरिया, केनिया आणि येमेन यांसारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी भारतात येत असल्याचे दिसून येते.
अमेरिका तसेच युरोपमधील काही देशांमधून दंतशल्यचिकित्सेसाठी रुग्णांची संख्याही मोठी आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा भारताच्या आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय रुग्णांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारने १६७ देशांसाठी ई-मेडिकल व्हिसा सेवा सुरु केली असून, व्हिसा प्रक्रिया जलद करण्यात आली आहे. सरकारच्या हील इन इंडिया उपक्रमांतर्गत, व्हिसा प्रक्रियेला सुलभ करून आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने भारताची जागतिक वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून ओळख आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, रोबोटिक सर्जरी, टेलीमेडिसिन आणि संशोधन प्रयोगशाळांमध्ये गुंतवणुकीला चालना मिळेल.
महाराष्ट्र सरकारनेही यापूर्वी धोरण तयार करण्याची घोषणा केली होती. ज्याअंतर्गत वैद्यकीय प्रवास व पर्यटन यांचे एकत्रीकरणाची योजना होती. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येण्याची अपेक्षा होती. महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरे वैद्यकीय उपचार व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून मुंबईत हृदयरोग, कॅन्सर व अस्थिशल्य उपचारासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरीसाठी येणारा वर्गही मोठा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी नव्याने मेडिकल टुरिझमचे धोरण तयार करण्याचे निर्देश आरोग्य सचिव निपुण विनायक यांना दिले आहेत. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री आबीटकर म्हणाले की, अलीकडेच आम्ही तामिळनाडुतील औषध खरेदी धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तेथे गेलो असताना मोठ्या प्रमाणात तेथे परदेशातून तसेच देशाच्या विविध भागातून वैद्यकीय उपचारासाठी रुग्ण येत असल्याचे दिसून आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथील खाजगी रुग्णालयात रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतून डॉक्टर येत असल्याचे दिसून आले.
मुंबईत तसेच महाराष्ट्रात अनेक नामांकित खाजगी रुग्णालये व तज्ञ डॉक्टर आहेत. शासकीय आरोग्य व्यवस्थेतही देशाच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात.याचा विचार करून मेडिकल टुरिझम महाराष्ट्रात वेगाने वाढावे यासाठी सर्वंकश धोरण आखण्याचे काम हाती घेण्यात आले असून येत्या एक महिन्यात हे धोरण जाहीर केले जाईल असे
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दशकात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या दहा वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३७८ वरून ७८० वर गेली आहे. देशात व महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होत असल्यामुळे एमबीबीएसच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. परिणामी तज्ञ डॉक्टर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून राज्यातील वैद्यकीय पर्यटन वाढविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.