* महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुण्याकडे
* ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय येत्या १ एप्रिलपासून महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे या संस्थेकडे पुढील तीन वर्षांसाठी जाणार आहे. या अगोदरची काही वर्षे महामंडळाचा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू असल्यामुळे यंदाच्या वर्षी या निवडीवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेकडून महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघ या महामंडळाच्या घटक संस्थेकडे आले आणि अध्यक्षपदी उषा तांबे यांची निवड करण्यात आली. सर्वसाधारणपणे ज्या घटक संस्थेकडे महामंडळाचे कार्यालय जाणार आहे, ती घटक संस्था अध्यक्षपदासाठीचे नाव आणि काही सूचना महामंडळला करते. महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते. महामंडळाच्या घटनेनुसार अध्यक्षाची निवड केली जाते. या पदासाठी निवडणूक होत नाही, असे महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘मसाप’कडे महामंडळाचे कार्यालय जाणार असून तेथे या पदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ‘मसाप’चे दोन प्रमुख पदाधिकारी आणि अन्य एक जण या पदासाठी इच्छुक आहेत. प्रत्येकजण आपापल्या प्रकारे या पदावर निवड व्हावी म्हणून मोर्चेबांधणी करत आहेत. तीनपैकी एका नावावर सहमती झाली नाही आणि ‘मसाप’मधील गटातटाचे राजकारण पराकोटीला गेले तर सहजपणे एका नावाची निवड होणे कठीण असून तसे झाले तर महामंडळ अध्यक्ष निवडीच्या इतिसाहात पहिल्यांदा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत महामंडळ नेमकी काय भूमिका घेईल, त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, ‘मसाप’ला अध्यक्षपदासाठीचे नाव आणि सूचना पाठविण्यास कळविले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत महामंडळाकडे कोणाची नावे अथवा सूचना आलेल्या नाहीत. महामंडळाच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी येत्या मार्च महिन्यात महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
त्या बैठकीपर्यंत ‘मसाप’कडून नाव आले नाही तर काय करणार, या प्रश्नावर त्यांनी, अजून काही दिवस शिल्लक आहेत. नाव आले नाही तर काय करायचे, त्याचा निर्णय तेव्हाच घेतला जाईल, असे उत्तर दिले. तर साहित्य महामंडळाकडे आमच्याकडून लवकरात लवकर नावे पाठवली जातील, असे ‘मसाप’च्या एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
साहित्य महामंडळाच्या पुढील अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
* महामंडळाचे कार्यालय १ एप्रिलपासून पुण्याकडे * ‘मसाप’च्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय येत्या १ एप्रिलपासून महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे या संस्थेकडे पुढील तीन वर्षांसाठी जाणार आहे.
First published on: 17-02-2013 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New president selection for literature corporation