मुंबई: आफ्रिकन देशांमध्ये आढळलेल्या ओमिक्रोन या करोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. 

येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसांतील आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, तसेच  त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण काटेकोरपणे करावे असे निर्देश चहल यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले.

कोविड-१९ विषाणूचा अत्यंत वेगाने पसरणारा नवीन प्रकार काही आफ्रिकन देशांमध्ये आढळला असून त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सर्वाना धोक्याचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना निर्देश दिले. त्यानंतर आयुक्तांनी संध्याकाळी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक दृकश्राव्य माध्यमातून घेतली.  या बैठकीत कोविड विषाणूचा ओमिक्रोन प्रकार आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यावी लागणारी खबरदारी या दिशेने सविस्तर चर्चा करण्यात आली. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक यांनी देखील मार्गदर्शन केले.

नवीन विषाणू प्रकाराचा धोका पाहता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने देखील आपापल्या स्तरावर आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्तांनी केल्या.

खबरदारी काय घ्याल?

 ज्या आफ्रिकन देशांमध्ये नवीन कोविड विषाणू आढळला आहे, तेथून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आला तर, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) काटेकोरपणे तपासावे. प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत आहेत किंवा काय याबाबत वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी. सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण करावे, बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (जीनोम स्क्वििन्सग) पडताळावे. तसेच बाधिताच्या सान्निध्यातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, अशा सूचना देखील चहल यांनी दिल्या आहेत.

‘करोना उपचार केंद्र तयार ठेवा’

महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोविड सेंटर योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा घ्यावा, अशा सूचना चहल यांनी केल्या.

Story img Loader