मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे”, असं फडणवीसांनी म्हटल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन नाही हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचं जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये”, असं नाना पटोले यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले फडणवीस?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धूळफेक असल्याची टीका केली आहे. “सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातली नियमित तरतूद आहे. त्यामुळए ही करोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचं पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे; वाचा नेमकं काय म्हणाले फडणवीस

९० हजार कोटी मिळवू द्या!

दरम्यान, नाना पटोले यांनी फडणवीसांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. “करोनाच्या विळख्यात सगळेच आले आहेत. अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा दिल्लीत तुमचं वजन असेल तर दिल्लीतून महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटी आणि इतर अनेक गोष्टींचे अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत. यांचं दिल्लीत काही वजन नाही कारण यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आम्हाला वेगळा निधी द्यायची गरज नाही. आमचेच पैसे त्यांनी द्यावेत. तर राज्य सरकार सगळ्यांना मदत करेल. राज्य सरकारकडून ते करून घ्यायची जबाबदारी काँग्रेसची असेल. पण यात त्यांनी राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं आम्ही समर्थन करतो आणि पॅकेजसाठी अभिनंदन करतो. पण त्यात काही घटक सुटलेले आहेत. न्हावी, फुल विक्रेते, शेतकरी यांचा त्यात समावेश करावा ही मागणी करणारं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून दिलं जाणार आहे”, असं नाना पटोल म्हणाले आहेत.

देशात करोना पसरताना मोदी काय करतायत?

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली आहे. “आज राजकारणापलीकडे जाऊन लोकांचा जीव वाचवणं हे सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. देशात सगळ्याच राज्यांमध्ये करोना पसरू लागला आहे. आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत? त्यांना निवडणुकांचं पडलं आहे. विनामास्क प्रचार करून ते काय संदेश देत आहेत? एकीकडे मास्क घाला असं सांगतात आणि स्वत: पंतप्रधान प्रचारात मस्त आहेत आणि जनता करोनाने त्रस्त आहे. लोकांचा जीव जातोय. ज्याचं जळतं, त्याला कळतं. अनेक परिवारांमध्ये करोनामुळे कर्ते लोकं मरण पावले आहेत. त्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहिले आहेत. त्या अश्रूंवर कुणी राजकारण करू नये, असा आमचा त्यांना सल्ला आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल अर्थात आज रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनवर बोलताना आचारसंहितेचा भंग केला? प्रवीण दरेकरांनी केला आरोप!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपाकडून तीव्र शब्दांत टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader