मुंबई : विविध क्षेत्रांत लखलखते यश संपादन करणाऱ्या आणि समाजोपयोगी कामांत झोकून देत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या युवकांमधील ऊर्जा, उद्यामशीलता, जिद्द आणि प्रज्ञेला गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे यंदाचे पर्व सुरू झाले आहे. त्यासाठी प्रज्ञावंत तरुण तेजांकितांचा शोध सुरू झाला असून पुरस्काराचे अर्ज आजपासून उपलब्ध झाले आहेत.
उज्ज्वल भविष्य साकारायचे तर विचारांच्या जुनाट चौकटी मोडाव्याच लागतात. प्रत्येक पिढीत असा नव्याचा शोध घेणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य करणारे अनेक तरुण असतात. ‘लोकसत्ता’ने अशा प्रज्ञावंत तरुणांना योग्य वेळी प्रोत्साहन देण्यासाठी ‘तरुण तेजांकित’चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, धोरणे, राजकारण आणि शासन, उद्याोजकता, व्यवसाय, सामाजिक कार्य, क्रीडा, कला, मनोरंजन आदी विविध क्षेत्रातील युवा पिढीचे कार्य हे काळाला नवी झळाळी देणारे आणि समाजाला दिशा देणारे ठरते. विविध क्षेत्रातील तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणारा आणि कौतुकाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे. महाराष्ट्रात भरभरून असलेल्या युवा गुणवत्तेला, व्यावसायिकता जपत नावीन्यपूर्ण काम करण्याच्या त्यांच्या जिद्दीला तसेच, शहरी आणि ग्रामीण भागातील नवउद्याोजक व संशोधकांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात येते. यंदा या उपक्रमाचे सातवे वर्ष असून आतापर्यंत देशभरातील १०० हून अधिक प्रज्ञावंत तरुण मंडळींचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात
प्रवेशअर्ज कसा भराल?
‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठीच्या निवड प्रक्रियेचे तपशील https:// taruntejankit.loksatta.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून प्रवेशपत्रिका ऑनलाइन भरून पाठवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर आपल्याभोवताली असणाऱ्या गुणवंत तरुण-तरुणींची नावे माहितीसह सुचवता येतील.
● ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध करणारे चाळिशीच्या आतील युवा गुणवंत या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील.
● पुरस्कार प्रक्रियेचा भाग होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून प्रवेशपत्रिका भरणे बंधनकारक आहे.
● आलेल्या प्रवेशिकांमधून मान्यवरांची स्वतंत्र समिती विविध निकषांच्या आधारे ‘तरुण तेजांकितां’ची निवड केली जाईल.
● निवड झालेल्या प्रज्ञावंतांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येईल