ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा दरम्यान १५ फेब्रुवारीपर्यंत उपनगरी गाडीच्या सहा नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कर्जत आणि कसारा येथपर्यंत १५ डब्याची उपनगरी गाडी सुरू करण्यात येणार आहे.
कल्याण ते लोणावळा या मार्गाचे वार्षिक परीक्षण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी शुक्रवारी केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ठाण्यापर्यंत उपनगरी गाडय़ांच्या विद्युतीकरणातील बदलाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. त्याचप्रमाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचेही विद्युतीकरणातील बदलाचे काम पूर्ण होईल. यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाडय़ांचे इगतपुरी येथे इंजिन बदलण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या कर्जत आणि कसारा मार्गाचे विद्युतीकरणाच्या बदलाचे काम पूर्ण झाले असून तेथे जुन्या प्रकारच्या विद्युतीकरणावर चालणारी गाडी चालू शकत नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या विद्युत भारावर चालणारी गाडी मध्य रेल्वेला उपलब्ध झाली असून १५ जानेवारीपर्यंत आणखी दोन गाडय़ा मिळण्याची शक्यता असल्याने या फेऱ्या सुरू करणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यान १५ डब्यांची गाडी सुरू झाल्यानंतर कर्जतपर्यंत नव्या वर्षांत ही गाडी सुरू करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले होते. मात्र केवळ कर्जतपर्यंतच नव्हे तर कसारा मार्गावरही ही गाडी चालविण्याचे प्रयत्न असून ३१ मार्चपर्यंत दोन्ही मार्गावर १५ डब्यांची गाडी सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा