‘कारपुलप्रणाली’च्या साह्यने प्रवासखर्च वाचवण्याची संधी,
सानपाडय़ातील तरुणाने विकसित केलेले अ‍ॅप अँड्रॉइडवर
झपाटय़ाने होणाऱ्या नागरीकरणासोबत प्रत्येक शहराला वाढत्या वाहनसंख्येचा प्रश्न भेडसावू लागला आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने वाहतूक कोंडीसोबतच प्रदूषणाच्या पातळीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून दिल्लीमध्ये ‘सम-विषम’ असा प्रयोग राबवण्यात येत असतानाच आपल्या वाहनातून अन्य प्रवाशांना सशुल्क ‘लिफ्ट’ देण्याची ‘कारपुलिंग’ या संकल्पनेची गरज व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर सानपाडय़ातील एका २६ वर्षीय तरुणाने अँड्रॉइडवर ‘सहप्रवासी’ हे अ‍ॅप विकसित केले असून त्याद्वारे ईप्सित स्थळी जाण्यासाठी त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांचा शोध घेण्याची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीमुळे प्रवाशांचा खर्च वाचण्यासोबतच वाहनचालकालाही अर्थार्जन करता येणार आहे. शिवाय अशा प्रकारे वाहनांची इंधनबचत आणि वाहतूक कोंडी कमी करणेही शक्य होणार आहे.
अनेकदा एका चारचाकीतून एकटा वाहनचालक प्रवास करत असतो. अशा वेळी जोडीला अन्य प्रवाशांना घेऊन प्रवास केल्यास वाहनचालकास पैसे मिळतातच; पण प्रवाशांचीही सोय होते. या पद्धतीला ‘कारपुलिंग’ असे म्हटले जाते. ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून भारतात दाखल झाली आहे. मात्र, तिचा प्रत्यक्ष वापर फारच कमी प्रमाणात होताना दिसतो. खासगी वाहनचालक आणि प्रवासी यांच्यात संपर्क नसणे, हे याचे प्रमुख कारण समजले जात होते. हीच गोष्ट हेरून प्रशांत यादव या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभ्यासात मास्टर्स पदवी मिळवलेल्या तरुणाने ‘सहप्रवासी’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर नोंदणी करणारे प्रवासी व वाहनचालक एकमेकांशी संपर्क साधून ‘सहप्रवासा’बद्दल विचारणा करू शकतात.
‘कारपुलिंग ही संकल्पना रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी व पर्यायाने प्रदूषणात घट करण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय अशा पद्धतीमुळे वाहनचालकाला उत्पन्न मिळवून आपला इंधनखर्च कमी करता येतो तर सहप्रवाशाचा पैसा आणि वेळ या दोहोंत बचत होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारचे अ‍ॅप विकसित करण्याची कल्पना सुचली होती. ती आता प्रत्यक्षात अवतरली,’ असे प्रशांतने सांगितले. काही दिवसांपूर्वीच अँड्रॉइडवर उपलब्ध झालेले हे अ‍ॅप आतापर्यंत २०८जणांनी डाउनलोड केले असून ९६ जणांनी त्यावर नोंदणीही केल्याचे प्रशांतने सांगितले.
मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विषयात ‘बीई’ झालेल्या प्रशांतने फ्रान्समधील पॅरिस येथे जाऊन या विषयात ‘एमएस’ ही पदवी मिळवली. तेथून परतल्यानंतर तो सध्या ‘अँड्रॉइड डेव्हलपर’ म्हणून काम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘सहप्रवासी’च्या निर्मितीत गुंतलेल्या प्रशांतला काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रणव चंद्रात्रे याची मदत मिळाली. या दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वीच हे अ‍ॅप अँड्रॉइडवर आणले आहे.
* अ‍ॅप’ कसे काम करते?
* सहप्रवासी अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांला त्यात आपली नोंद करावी लागते. मोबाइल क्रमांक आणि ईमेलच्या पडताळणीनंतर तो अ‍ॅपचा नोंदणीकृत सदस्य बनतो.
* वापरकर्त्यांला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणाचे नाव अ‍ॅपमध्ये टाकताच त्या मार्गावरून जाणाऱ्या अ‍ॅपच्या सदस्यवाहनचालकांची नावे नकाशात दिसतात. त्या वाहनचालकाशी संपर्क साधून भेटीचे ठिकाण व प्रवासशुल्क ठरवून वापरकर्त्यांला प्रवास करता येतो.
* सुरक्षिततेसाठी वाहनचालक आणि प्रवासी यांना आपापले छायाचित्र ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. याद्वारे होणारी फसवणूक टाळता येते.
* सहप्रवासा’चे फायदे
* प्रवास जलद होतो.
* पैशाची बचत होते.
* वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत.
* स्वत:च्या वाहनाने गेल्यास होणारा इंधनखर्च, पार्किंग शुल्क, टोलचे पैसे हा खर्च वाचवता येतो.
* एकाच ठिकाणी कामावर जाणाऱ्यांसाठी उपयुक्त.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा