मुंबई : भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्या प्रस्तावास मागील महिन्यांत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेतील हत्तीणीचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, देशी अस्वल आदी प्राणी उपलब्ध आहेत. त्यातच मागील चार वर्षांत राणीच्या बागेत सन २०२० पासून कोणताही नवीन प्राणी आणलेला नाही. त्यामुळे नवीन सर्पालय हे प्राणी संग्रहालयाचा आकर्षणबिंदू ठरू शकेल.
हेही वाचा – पीकविमा योजनेत अमूलाग्र बदल, कृषिमंत्र्यांकडून संकेत, विरोधकांची टीका
हेही वाचा – कांदिवली – दहिसरमध्ये महापालिकेतर्फे पाच हजार झाडांचे रोपण, वृक्षारोपणात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
सिंहासाठी धडपड
मागील एक दोन वर्षांपासून राणीच्या बागेत सिंह आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, अजून त्यावर ठोस उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, सिंहाच्या बदल्यात देण्यासाठी प्राणीसंग्रहालयात पेंग्विन व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी नसल्याचे संचालक त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र, पेंग्विन घ्यायला कोणीही तयार नसल्याने म्हणजे पेंग्विनसाठी लागणाऱ्या सुविधा इतर प्राणीसंग्रहालयात नसल्याने सिंहाच्या बदल्यात पेंग्विन देणे शक्य नाही. त्यामुळे सिंहाला आम्ही दत्तक घेणार असे त्रिपाठी यांनी सांगितले.