लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : काही वन्यजीव संशोधकांनी आंबोलीमधील जैवविविधतेचा प्रत्यय देणारे संशोधन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावात कोळ्याची नवीन प्रजाती शोधण्यात यश आले असून ‘ इंडोथेल आंबोली’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे.

पश्चिम घाटात कोळ्याच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, अंबालापारंबिल वसु सुधीकुमार, गौतम कदम आणि डॅनिएला शेरवूड यांनी हा शोध लावला आहे. याबाबतचा शोधनिबंध ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या दोनपैकी एक प्रजाती आंबोलीत, तर, दुसरी प्रजाती केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये सापडली. सायलेंट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये सापडलेल्या प्रजातीचे ‘इंडोथेल सायलेंटव्हेली’ असे नामकरण करण्यात आले आहे.

दोन्ही प्रजाती ‘इंडोथेल’ कुळातील आहेत. या कुळाचा ‘इश्नोथेलिडे’ या कुटुंबात समावेश होतो. ‘इश्नोथेलिडे’ कुटुंबातील कोळी भारत, आफ्रिका, मादागास्कर आणि श्रीलंकेमध्ये आढळतात. भारतात ‘इश्नोथेलिडे’ कुटुंबातील ‘इंडोथेल’ या कुळातील कोळी आढळतात. या कोळ्यांच्या अधिवासाचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण भारतात असून त्याच्या भारतात पाच आणि श्रीलंकेत एक प्रजाती आढळते. दरम्यान, आंबोलीत सापडलेली प्रजाती ही जाळे विणणारी आहे. वन्यजीव संशोधक गौतम कदम यांना ‘व्हिसलिंग वूड्स आंबोली’ येथे ही प्रजाती आढळली होती. हा कोळी सुमारे १ सेंटीमीटर आकाराचा आहे. हा कोळी फिशिंग स्पायडर कोळ्यासारखे जाळे विणतो.

यापूर्वी पुणे येथे शोध

मागील वर्षी बाणेर टेकडी येथे उडी मारणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती सापडली असून, ‘ओकिनाविसियस टेकडी’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी, केरळमधील ख्राईस्ट कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी हे संशोधन केले. त्यांना एमआयटीतील डॉ. पंकज कोपर्डे, ख्राइस्ट कॉलेजचे डॉ. ए. व्ही. सुधिकुमार यांनी मार्गदर्शन केले. युनायटेड किंग्डममधील अराक्नोलॉजी या संशोधनपत्रिकेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. बाणेर टेकडीवरील चारा, वड-पिंपळ आदींवर ही नवी प्रजाती असल्याचे निदर्शनास आले. ही प्रजाती टेकडीवर आढळल्याने त्याचे नामकरण करताना त्यात टेकडीच्या नावाचा समावेश करण्यात आला. ‘ओकिनाविसियस टेकडी’ आणि इतर स्थानिक प्रजातींची त्यांच्या परिसंस्थेत काय भूमिका आहे या दृष्टीने अधिक अभ्यास करण्यात येत आहे.

आंबोलीचे वैशिष्ट्य काय ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीचा उगम सह्याद्रीच्या रांगांमधील आंबोलीत होतो. हा भाग जैवविविधतेने संपन्न आहे. आत्तापर्यंत आंबोलीमध्ये २५ नवीन प्रजातींचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यामध्ये कोळी, साप, मासा, उभयचर यांचा समावेश आहे.