तब्बल ३३ वर्षांनी प्रयोगाचे नूतनीकरण

मुंबई : ‘नेहरू विज्ञान केंद्र’ म्हटलं की, प्रवेशद्वारावरच घरंगळत जाणाऱ्या चेंडूमुळे घडणाऱ्या विविध करामतींचा भलामोठा प्रयोग बच्चेकंपनीसह मोठय़ांचेही लक्ष वेधून घेतो. केंद्राच्या स्थापनेपासून म्हणजेच १९८५ पासून विज्ञानप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या या प्रयोगाचे तब्बल ३३ वर्षांनी नूतनीकरण करण्यात येत असून एका नव्या स्वरूपात आणि नव्या गमतीजमती घेऊन लवकरच विज्ञानप्रेमींच्या भेटीस येत आहे.

एका विशिष्ट उंचीवरून घरंगळत आल्यामुळे चेंडूला गती येते आणि ऊर्जेचे एका प्रकारामधून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. ऊर्जेचे हे रूपांतरण मनोरंजक पद्धतीने दाखवणारा ‘दि एनर्जी बॉल’ हा प्रयोग नेहरू विज्ञान केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच पाहायला मिळतो. केंद्राच्या स्थापनेच्या वेळेस म्हणजेच १९८५ साली हा प्रयोग स्थापित करण्यात आला. दरम्यानच्या काळामध्ये झालेली तंत्रज्ञानाची प्रगती, बांधणीचे नवे तंत्र आदी बाबींचा वापर करून या प्रयोगामध्ये नावीन्यता आणण्याच्या उद्देशाने तब्बल ३३ वर्षांनी याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ‘रोलिंग बॉल स्क्लप्चर’ या नव्या नावाने विज्ञानप्रेमींच्या भेटीला तो येणार आहे. या प्रयोगामध्ये ‘काईनॅटिक आर्ट’ या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. चेंडूमधील गतिज ऊर्जेचा वापर करून उभारण्यात आलेल्या या प्रयोगामध्ये गतिमान आणि स्थिर मार्गिकेचे सहा विभाग उभारण्यात येणार आहेत. एका भागामध्ये सायकलचे पॅडल मारल्यानंतर निर्माण झालेल्या ऊर्जेच्या माध्यमातून चेंडू एका विशिष्ट उंचीवर नेला जाईल. त्यानंतर कल्पकतेने साकारण्यात आलेल्या रचनात्मक आकारांमधून घरंगळत जात तो विविध करामती घडवील. या प्रयोगाच्या दुसऱ्या भागांमध्ये यांत्रिक ऊर्जेच्या साहाय्याने चेंडू विशिष्ट उंचीवरून रचनात्मक पद्धतीने घसरत खाली येतो.

ऊर्जा संवर्धनाच्या नियमानुसार चेंडूमध्ये निर्माण झालेल्या गतिज ऊर्जेमुळे चेंडू विविध मार्गिकेमधून फिरत असताना विविध वाद्य वाजवतो. अशा अनेक गमतजमती या प्रयोगामध्ये पाहता येणार आहेत. पूर्वीच्या प्रयोगामध्ये प्रेक्षकांना चेंडू सरकवावा लागत होता. मात्र नव्या स्वरूपातील या प्रयोगामध्ये केंद्राच्या दाराशी आल्यानंतर सेन्सॉरच्या माध्यमातून सर्व यंत्रणा सुरू होऊन मोटारच्या साहाय्याने चेंडू विशिष्ट उंचीवरून सोडण्यात येईल. केंद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांना हा प्रयोग निश्चितच आश्चर्यचकित करेल, असे विज्ञान केंद्राच्या मॅकेनिकल विभागाचे प्रमुख कपिल जैन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या संपूर्ण प्रयोगाची रचना विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जात असून सध्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ामध्ये विज्ञान केंद्राला भेट देणाऱ्या बच्चे कंपनीला हा नवा प्रयोग पाहता येणार आहे.

– कपिल जैन, नेहरू विज्ञान केंद्र

Story img Loader