मुंबई : दहिसर पश्चिम येथे एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या नव्या जलतरण तलावाच्या टाईल्स निखळू लागल्या असून त्याच्या आजूबाजूच्या टाईल्सही कमकुवत होत आहेत. परिणामी, मुंबई महानगरपालिकेने हा तलाव जलतरणासाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त दहा – बारा दिवस हा जलतरण तलाव बंद ठेवावा लागणार आहे. मात्र अवघ्या तीनच महिन्यांत तलावाची दुरुस्ती करण्याची वेळ आल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरातील महानगरपालिकेचा जलतरण तलाव एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आला होता. उद्घाटन समारंभाशिवाय हा जलतरण तलाव सुरू करण्यात आला होता. त्याचवेळी मालाड पश्चिमेकडील चाचा नेहरू मैदानाजवळील जलतरण तलावही सुरू करण्यात आला होता. मात्र तीन महिन्यांतच दहिसर येथील जलतरण तलावाच्या आतील भागातील लाद्या निखळू लागल्या आहेत. सुरुवातीला एक दोन लाद्या निखळल्यानंतर आजूबाजूच्या लाद्या निघू लागल्या. त्यामुळे हा तलाव जलतरणासाठी बंद करण्यात आला असून तलाव कोरडा करून लाद्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीनिमित्त हा जलतरण तलाव दहा – बारा दिवस बंद ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई: अल्पवयीन मुलीवर वडील आणि प्रियकराकडून लैंगिक अत्याचार

दहिसर पश्चिम येथील जलतरण तलाव नव्याने बांधण्यात आला असून १ एप्रिलपासून तो पोहोण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या तलावाच्या उद्घाटनावरून राजकीय वादही झाला होता. आता लाद्या निखळल्यामुळे हा जलतरण तलाव पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, सध्या तलावाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराने हाती घेतले आहे. हमी कालावधी सुरू असल्यामुळे कंत्राटदाराकडूनच हे काम करून घेण्यात येत आहे. जलतरण तलाव २७ जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या तलावाच्या सदस्यांना मालाड, कांदिवली व दहिसर पूर्व येथील जलतरण तलावात पोहोण्याची परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यांतच तलावाची दुरुस्ती करण्याची वेळ आल्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मात्र तत्पूर्वी यामागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New swimming pool in dahisar closed due to taking up repair work mumbai print news ssb
Show comments