लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कार्यवाही गुरुवारी पूर्ण झाली.

महापालिकेच्या जलअभियंता खात्यातील ४४ अभियंते आणि २०० कामगार, कर्मचा-यांनी ३० तास अविरत कार्यरत राहून जलवाहिनीची कामे पूर्ण केली. तसेच, अन्य दुरुस्तीकामेही मार्गी लावण्यात आली आहेत. त्यामुळे जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा योग्य दाबाने होणार आहे. जलवाहिनी भारित (चार्जिंग) झाल्यानंतर एस, एल, के पूर्व, एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील परिसरांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत केला जाणार आहे.

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगद्यादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा अंशत: खंडित करून नवीन २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले होते. त्या कामासाठी बुधवार आणि गुरुवारी मुंबईतील एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता.

महापालिकेच्या जलअभियंता खात्यातील अभियंत्यांनी संबंधित काम विहित वेळेत पूर्ण केल्यामुळे आता टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. संबंधित जलवाहिनीचे काम महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्या नेतृत्वाखाली ३ उप जलअभियंते, ४ कार्यकारी अभियंते, ७ सहायक अभियंते, १५ दुय्यम अभियंते, १५ कनिष्ठ अभियंते यांनी जलवाहिनीची कामे पूर्ण केली.

एकाचवेळी विविध ठिकाणी दुरुस्ती

पवई तलाव, भांडुप, मरोशी, मोरारजीनगर, वांद्रे, विजयनगर पूल, सहार गाव, सहार कार्गो आणि धारावी आदी विविध ठिकाणी एकाचवेळी दुरुस्ती कामे करण्यात आली. त्यात पवई उच्च पातळी जलाशय क्रमांक १ च्या जलवाहिनीची गळती बंद करण्यासाठी दुरुस्ती केली, तसेच झडपांची दुरुस्ती करण्यात आली. भांडुप टेकडी जलाशय क्रमांक १ च्या दोन्ही कप्प्यांचे विलगीकरण व स्वच्छता करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New tansa water pipeline commissioned mumbai print news mrj