हृदयविकारावरील अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयरोपण अशा विविध उपचारांमध्ये आता आणखी एका तंत्राची भर पडली आहे. कृत्रिम हृदयाप्रमाणे काम करणाऱ्या यंत्राचे रोपण करणारी पहिलीच शस्त्रक्रिया चेन्नई येथील फोर्टिस मल्हार येथे पार पडली असून त्यासाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च आला आहे.
चेन्नई येथे राहणारे सतीश कुमार (४२) यांना जुलैमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे हृदय केवळ १५ ते २० टक्के काम करीत होते. त्यामुळे तातडीने हृदयरोपण करणे आवश्यक होते. मात्र हृदयरोपणासाठी साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागतो. सतीश कुमार यांच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असल्याने फोर्टिस मल्हारच्या हृदयविकारशास्त्र विभागाचे संचालक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी हार्टवेअर वेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस या यंत्राचा उपयोग करण्याचे ठरवले. या यंत्राचे वजन १५० ग्रॅम असून ते हृदयाखालील भागात शरीरात नीट बसवता येते. हृदयातील उजवी बाजू नीट काम करीत असेल, तर डाव्या बाजूच्या रक्तशुद्धीकरणाच्या कामात हे यंत्र मदत करते. हे यंत्र बॅटरीवर चालत असून पोटाला बाहेरच्या बाजूने त्याच्या बॅटरी लावणे गरजेचे ठरते.
अमेरिकेत या यंत्राचा उपयोग झाला असून पहिली शस्त्रक्रिया सात वर्षांपूर्वी झाली आहे, अशी माहिती बालकृष्णन यांनी दिली. हे यंत्र हृदयातील डाव्या बाजूच्या रक्तशुद्धीकरणासाठी मदत करते. काही काळाने हृदयरोपणही करता येते. हे यंत्र महाग असल्याचे बालकृष्णन यांनीही मान्य केले. मोबाइलच्या किंमती जशा कमी झाल्या तसेच हे तंत्रज्ञानही जास्तीत जास्त उपयोगात आल्यास त्याच्या किंमती कमी होतील. या पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आणखी दोन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या असून त्यासाठी यंत्र कमी किंमतीला उपलब्ध झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हे यंत्र लहान असल्याने स्त्रिया तसेच लहान चणीच्या व्यक्तिंमध्येही त्याचा उपयोग करता येईल, असे कार्डिअ‍ॅक अ‍ॅनेस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश राव यांनी सांगितले.  
 सर्वात महागडी शस्त्रक्रिया
अँजिओप्लास्टीसाठी तीन ते पाच लाख, बायपाससाठी दहा लाख तर हार्ट ट्रान्सप्लाण्टसाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च येतो. प्रत्येक रुग्णालयानुसार, वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रियेतील जोखमीनुसार त्यात कमी अधिक फरक पडतो. मात्र एचव्हीएडी या यंत्राची किंमत ६० लाख रुपये आहे. शस्त्रक्रियेचा खर्च लक्षात घेऊन या उपचारांसाठी ८० लाख रुपये खर्च आला आहे.  
वैद्यकीय विम्याचा आधार
प्रचंड खर्चाची ही शस्त्रक्रिया वैद्यकीय विम्यामुळे शक्य झाली. संबंधित रुग्ण हा आंतरराष्ट्रीय बँकेत वरिष्ठ पदावर कामाला आहे. विमा रक्कम डॉलरमध्ये ठरवली जात असल्याने भारतीय रुपया घसरत असतानाही समस्या निर्माण झाली नाही. विमा रकमेबाबत अजूनही संबंधित कंपनीशी चर्चा सुरू आहे.

Story img Loader