नीलेश अडसूळ

प्रायोगिक रंगभूमीचे हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रकाशझोतात आलेले प्रभादेवीचे रवींद्र नाटय़ मंदिर येथील नवे नाटय़गृह खुले होण्यास आता येता मार्च उजाडणार आहे. हे नाटय़गृह मार्च २०२०मध्ये खुले करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आधीच बांधकामाला झालेला उशीर आणि त्यानंतर लागू झालेली टाळेबंदी यांमुळे नाटय़गृहाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता पुढील तीन महिन्यांत बांधकाम पूर्ण होऊन मार्चपासून नाटय़गृह खुले होण्याची शक्यता आहे.

प्रायोगिक रंगभूमीची अडचण लक्षात घेऊन २०१९ला रवींद्र नाटय़ मंदिरात पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर नाटय़गृह तर सातव्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे काम निविदा मागवून वेगात सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी ‘मार्च २०२०ला पडदा उघडणार’ अशी घोषणा संचालकांनी केली. मात्र नाटय़गृहाचे काम ५० टक्के  पूर्ण झाले आणि टाळेबंदी लागू झाली. कंत्राटदाराकडचे कामगार गावी निघून गेले. शिथिलीकरणानंतर कामाने वेग घेणे अपेक्षित होते. पण कंत्राटदाराने कामगार नसल्याचे सांगत चालढकल सुरू केली. विशेष म्हणजे या नाटय़गृहाच्या खुर्च्या खास जपानवरून आयात करण्यात येणार होत्या. परंतु करोनामुळे त्याही रखडल्या. सद्य:स्थितीत त्या आणाव्यात की अन्य काही पर्याय स्वीकारावा यावर चर्चा सुरू असल्याचे समजते. ‘अद्याप ७० टक्के काम पूर्ण झाले असून कामाचा वेगही वाढवण्यात आला आहे. लवकरात लवकर नाटय़गृह प्रयोगांसाठी सज्ज करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे रवींद्र नाटय़मंदिर आणि पु. ल. कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चावरे यांनी सांगितले.

प्रायोगिकचे महत्त्व अबाधित पण..

प्रायोगिक रंगभूमीचे नाटय़ क्षेत्रातील महत्त्व अबाधित असले तरी प्रायोगिक संस्थांकडे असलेली आर्थिक चणचण आणि दुसरीकडे मोठाल्या नाटय़गृहाचे अवाजवी भाडे यामुळे प्रयोगांमध्ये अडचणी निर्माण होतात. हे दुखणे गेली अनेक वर्षी रंगकर्मीकडून मांडले जात आहे. प्रायोगिक नाटकांना हक्काचे व्यासपीठ असावे, यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे, अरुण काकडे, कमलाकर नाडकर्णी आदि मंडळींनी कायमच आग्रही भूमिका धरली होती. त्यामुळे अनेक संस्थांचे या नाटय़गृहाकडे डोळे लागले आहेत.

एकीकडे व्यावसायिकचे प्रयोग हाउसफुल्ल होत आहेत. पण प्रायोगिक रंगभूमी चाचपडते आहे. इथले आर्थिक प्रश्न अधिक जटिल आहेत. करोनाकाळात हे नाटय़गृह खुले झाले तर प्रायोगिक किंवा हौशी रंगभूमीला दिलासा मिळेल.

– रवी सावंत, रंगकर्मी, आविष्कार