गोरेवाडा बचाव केंद्राचा हस्तांतरास नकार

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल होणाऱ्या नव्या वाघाच्या आगमनाचे दरवाजे बंद झाले आहेत. नागपूरमधील गोरेवाडा वन्यजीव बचाव कें द्रामधून हा नवीन सदस्य राष्ट्रीय उद्यानात आणला जाणार होता. मात्र आता प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाचे कारण पुढे करत गोरेवाडा वनाधिकाऱ्यांनी वाघाच्या हस्तांतरास नकार दिला आहे.

मध्य प्रदेशामधून महाराष्ट्राच्या तुमसर तालुक्यात दाखल झालेल्या आणि येथे निर्भीडपणे वावरणाऱ्या एका अडीच वर्षांच्या नर वाघाला वन विभागाने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जेरबंद केले होते. तेव्हापासून हा वाघ गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात बंदिस्त आहे. या वाघाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र प्रकल्पामध्ये आणण्यासाठी उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र आता हे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसत आहे. कारण भविष्यात गोरेवाडय़ामध्ये उभे राहणाऱ्या प्राणिसंग्रहालयात या वाघाला प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने त्याला नागपूरमध्येच ठेवण्याचा निर्णय वनाधिकाऱ्यांनी घेतला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानंतर या नर वाघाला गोरेवाडय़ामध्येच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गोरेवाडा वनपरिक्षेत्राचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांनी दिली. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्राणिसंग्रहालयामध्ये या वाघाला प्रदर्शित करण्याचा विचार आहे. त्यामुळे मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात त्याला पाठविण्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सध्या सात वाघ अस्तिवात आहेत. यामध्ये तीन नर असून चार माद्या आहेत. माद्यांमध्ये १३ वर्षांची बसंती ही वृद्ध मादी असून तिची मुलगी लक्ष्मीदेखील या ठिकाणी आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणण्यात आलेल्या मस्तानी आणि बिजली या माद्यादेखील प्रकल्पामध्ये नादंत आहेत. नर वाघांमध्ये बाजीराव नावाचा वृद्ध पांढरा वाघ आणि आनंद-यश नावाचे सात वर्षांचे दोन वाघ आहेत. असे असूनही गेल्या काही वर्षांपासून व्याघ्र प्रकल्पामध्ये पाळणा हललेला नाही. त्यामुळे प्रकल्पामधील वाघांच्या प्रजननाच्या दृष्टीने गोरेवाडय़ातील या तरुण वाघाला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी करत होते. यासाठी अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने प्रत्यक्षात गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राला भेट देऊन वाघाची पाहणी देखील केली होती.

Story img Loader