अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतील निवडणुकीत सोमवारी नवेच नाट्य उघडकीस आले. मतमोजणीच्यावेळी सुमारे ६०० मतपत्रिका मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या लक्षात आले. पैकी २०० मतपत्रिका या बोगस असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचे समजते. उर्वरित मतपत्रिकाही बोगस असण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर हे याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची मुदत रविवारी संध्याकाळी संपली. त्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईत मतमोजणी सुरू करण्यात आली. नाट्य परिषदेचे महाराष्ट्रात १५ हजार मतदार आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर मतदारसंख्येपेक्षा जास्त मतपत्रिक तिथे आल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व मतपत्रिकेंची छाननी करून बोगस मतपत्रिका बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली. ६०० मतपत्रिका जास्त असल्याचे अधिकाऱयांच्या लक्षात आले. जास्त मतपत्रिका आढळल्यानंतर मतमोजणीचे काम थांबविण्यात आले.
बोगस मतपत्रिकांमुळे ही संपूर्ण निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी ‘नटराज’ पॅनलच्या विनय आपटे यांनी केली. तर ‘उत्स्फूर्त’ पॅनलचे मोहन जोशी यांनीही निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले असून, ऐनवेळी नियम बदलण्यात आले, हे सगळेच अतिशय चुकीच असल्याचे म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा