सरत्या वर्षांला ‘अलविदा’ म्हणत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षांचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. पहाटे पाच वाजेपर्यंत उपाहारगृह सुरू ठेवण्याची परवानगी मिळाल्यामुळे गिरगाव चौपाटी, कुलाबा, जुहू, शिवाजी पार्क या भागात रात्रभर मुंबईकरांनी मनसोक्त मजा लुटली. नववर्षांच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांच्या भाषणात ‘आता काय घोषणा केली जाईल’ याची चिंता असतानाही ‘तिमिरातून तेजाकडे’ अशी अपेक्षा बाळगत मुंबईकरांनी खुल्या हातांनी नववर्षांला आलिंगन दिले.

नववर्षांच्या स्वागतासाठी कर्मचाऱ्यांनी अर्धा दिवसाची सुट्टी घेत पार्टीच्या तयारीसाठी घरी धाव घेतली होती, तर दुसरीकडे तरुणाईचा ताफा नियोजनाप्रमाणे पब आणि उपाहारगृहात थिरकत होता. नववर्षांच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे अनेक मुंबईकर शनिवारीच अलिबाग, मुरुड, लोणावळा, माथेरान अशा ठिकाणी रवाना झाले होते. रात्री १२ वाजल्यापासूनच नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वाचे मोबाइल संदेशांनी खणाणत होते. शनिवारी रात्रभर सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी ही मंदिरे खुली असल्यामुळे अनेक भाविकांनी तेथे गर्दी केली होती. सामाजिक माध्यमांवर तर गेल्या दहा दिवसांपासून नववर्षांचे संकल्प, सरत्या वर्षांतील आव्हाने, त्यात आलेले चांगले-वाईट अनुभव, २०१७ मध्ये निश्चलनीकरणाचा  परिणाम आदी विषयांवर चर्चा सुरू होती. नववर्षे साजरे करतानाची छायाचित्रे, त्यांवर लाखोंमधील लाइक्स, हजारोंमध्ये शेअर करीत सामाजिक माध्यमांवरील नववर्षेही अधिक कलकलाटात सुरू झाले. गेल्या ५० दिवसांत नोटाबंदी, २००० नोटांच्या सुटय़ाचा प्रश्न, ५०० रुपयांच्या नोटांचा अभाव असतानाही मुंबईकरांनी नववर्षांची सुरुवात धूमधडाक्यात केली.

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा ताफा चौकाचौकांवर ब्रेथ अ‍ॅनलाइजर घेऊन चालकांची तपासणी करीत होता, तर अवैधरीत्या दारू बाळगणारे आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक नेमण्यात आले होते.

पहाटे पाच वाजेपर्यंत उपाहारगृह सज्ज

नववर्षांच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासन आणि सरकारने उपाहारगृह पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाचा पारा चढला. इंडियन उपाहारगृह असोसिएशनने याबाबत पोलीस प्रशासनाला विनंती केली होती. त्यावर पहाटे पाचपर्यंत उपाहारगृह सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यामुळे रात्रभर उपाहारगृहात गर्दी दिसत होती.

पंतप्रधानांच्या भाषणाची आतुरता

गेल्या ५० दिवसांच्या निश्चलनीकरणानंतर आता पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वाचे लक्ष होते. त्यामुळे अनेक उपाहारगृहांनी मोदींचे भाषण लाइव्ह ठेवले होते. या वेळी नववर्षांच्या पार्टीवर विरजण पडेल या भीतीने नागरिक मोदींचे भाषणही ऐकत होते. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याप्रमाणे मोदींचे भाषण ऐकण्यासाठी मुंबईकरांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती.

ग्राहकांमध्ये ३० टक्क्यांनी घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईकरांमध्ये उत्साह दिसत असला तरी नवीन वर्षांनिमित्ताने उपाहारगृहांमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या प्रमाणात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. निश्चलनीकरणाचा परिणाम असल्याची शक्यता हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे निश्चलनीकरणाचे सावट नववर्ष जल्लोषावरदेखील पडल्याचे बोलले जात आहे.