मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही सचिवांसह १९ सनदी अधिकाऱ्यांनाही पदोन्नती
आदर्श घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईनंतर मनोबल खचलेल्या सनदी अधिकाऱ्यांना पदोन्नतीची नववर्ष भेट देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सनदी अधिकाऱ्याचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे सचिव अजितकुमार जैन यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी तर त्यांच्या अन्य दोन सचिवांसह १९ अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जैन यांना बढती देतानाच मुख्यमंत्र्यांचे अन्य दोन सचिव आशिषकुमार सिंग आणि नितीन करीर यांनाही प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले अपूर्व चंद्रा, महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, यशदाचे महासंचालक संजय चहांदे आणि आदिवासी विभागाचे आयुक्त राजेश कुमार यांनाही प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे.
महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक आशीष शर्मा, साखर आयुक्त विजय सिंघल, औरंगाबाद महापालिका आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासह आबासाहेब जऱ्हाड, एकनाथ डवले, राजेंद्र चव्हाण, पद्माकर गायकवाड, शिवाजी दौंड यांना सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तर वर्धा जिल्हाधिकारी नवीन सोना आणि म्हाडाचे मुख्याधिकारी निरंजन सुधांशू यांना निवडश्रेणीत पदोन्नती देण्यात आली आहे. कामगार विभागातील सह सचिव वाय. ई. केरूरे यांनाही सचिवपदी बढती देण्यात आली असून त्यांची दुग्धविकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा