मुंबई: अंधेरी रेल्वे स्थानकातील गोखले उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे अचानक बंद केल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीने मुंबईकर बेजार झाले आहेत. जुना पूल लवकर पाडून नवा पूल लवकर बांधण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा पूल तोडण्यासाठी नवे वर्ष उजाडणार आहे. पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून ती पूर्ण होण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत कालावधी लागणार आहे.
अंधेरीतील गोखले उड्डाणपूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पश्चिम रेल्वेकडून तोडण्यात येणार आहे. उड्डाणपूलाच्या पुनर्बांधणीचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या उड्डाणपुलाचा भाग पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. उड्डाणपुलाचा विरार दिशेने (उत्तर दिशा) असलेला भाग पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूल पाडकामासाठी एखाद्या कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. त्यामुळे पाडकाम सुरू होण्यासाठी जानेवारी २०२३ उजाडणार आहे. हे काम साधारण तीन महिने चालणार आहे. तोपर्यंत पुलाच्या चर्चगेट दिशेकडील एक मार्गिका मुंबई महानगर – पालिका सुरू करण्याच्या विचारात आहे.
विरार दिशेने (उत्तर दिशा)असलेल्या भागाचे पाडकाम आणि त्यानंतर पुनर्बाधणीचेही काम पूर्ण होताच त्वरीत उड्डाणपुलाचा चर्चगेट दिशेला असलेला भागासाठीही निविदा राबवून पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याचे ठाकूर म्हणाले. दरम्यान, सोमवारी मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. पुनर्बाधणीचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार असून कंत्राटदारांना निविदा भरण्याची अंतिम मुदत ही २५ नोव्हेंबर देण्यात आली आहे. या पुलासाठी साधारण ८४ कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे.