उत्तरेकडून का कुठूनसे आलेले थंडगार वारे, उधाणलेला दर्या, आकाशातल्या ताऱ्यांशी स्पर्धा करणारी ठिकठिकाणची रोषणाई, ती कमी पडेल म्हणून की काय, आकाशात सोडलेले मिणमिणते आकाशकंदील, आकर्षक पद्धतीने सजवलेली दुकाने आणि हॉटेल्स आणि या सर्वानाच साजून दिसतील अशा रंगीबेरंगी कपडय़ांतील तरुण-तरुणींचे थवे.. मुंबईतील माहोल ३१ डिसेंबरच्या रात्री एकदम ‘आशिकाना’ झाला होता. सरत्या वर्षांला निरोप देत नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, वांद्रे सी फेस यांच्यासह विविध मॉल्समध्ये मुंबईकरांनी गर्दी केली होती. रात्री बाराच्या ठोक्याला हातातले मद्याचे प्याले एकमेकांवर आपटून किणकिणले आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’च्या घोषणांनी अवघी मुंबई दणाणून गेली.
३१ डिसेंबरच्या रात्रीचे बेत बहुतांश मुंबईकरांनी आठवडाभर आधीच आखले होते. त्यानुसार काहींनी सुटय़ा टाकून या जादुई रात्रीचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली. तर बहुतांश लोक ऑफिस वगैरे आटपून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लवकरच निघाले. मुंबईच्या उपनगरांतून मुख्य शहराकडे येणाऱ्या गाडय़ा कधी नव्हे तो संध्याकाळी ओतप्रोत भरल्या होत्या. त्यामुळे लोकल गाडय़ांना संध्याकाळीही खच्चून गर्दी होती. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकांपासून ते सर्वच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही डोळ्यांत भरत होता.
ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दुकानांवर आणि हॉटेल्सवर रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ख्रिसमस ट्री, तारे, ख्रिसमससाठीचे तोरण अशा विविध पद्धतींनी सजावटही केली होती. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी बोचरे वारे सुटायला सुरुवात झाल्यानंतर तर मुंबईकर बेहोष झाले. थंड वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी मदिरेचे प्याले हातात घेऊन गप्पांचे फड रंगले. मुंबईतील ‘हॅपनिंग’ ठिकाणांवर तर तरुणांचे जथ्थे मोठय़ा प्रमाणावर फिरत होते. त्यांच्या वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळीकडेच नव्या वर्षांच्या स्वागताचा उत्साह भरला होता. जसजशी संध्याकाळ संपून रात्र चढत गेली, तसतसा हा उत्साह वाढत गेला. शहर व उपनगरांतील सर्वच हॉटेल काठोकाठ भरली होती. मयखान्यांमध्ये तर ‘पिना-पिलाना’ रंगात आले होते. रात्री बाराच्या ठोक्याला सर्वाच्याच हातातील प्याले एकत्र आले आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’चा जल्लोष झाला. नवीन वर्ष सुरू झाले होते. रात्र मात्र अजूनही तरुणच होती..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा