मुंब्रा येथील खडक रोड भागात माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी हिना शेख (२०) या महिलेच्या कानाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केल्यानंतर कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप हिनाच्या आईने केला असून त्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हिना हिचा वर्षभरापूर्वी मुमताज शेख (४५) याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर माहेरच्यांकडून हुंडा म्हणून काहीच न मिळाल्याने सासरच्या व्यक्तींकडून तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने आपण पैसे देऊ शकत नाही, असे हिनाकडून सांगण्यात येत होते. परंतु सासरच्यांकडून याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही.  उलट  पॉवरलूम घेण्यासाठी हिनाने आपल्या माहेरच्यांकडून एक लाख रुपये आणावेत यासाठी तिला माहेरी पाठविण्यात आले.
माहेरून परत आल्यानंतर हिनाने पैसे न आणल्याचा राग मनात ठेवून पती मुमताज शेख,  दीर शहनवाज शेख (२०), नणंद फिरोजा शेख आणि आजगरी शेख यांनी तिला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी नणंद फिरोजा हिने तिच्या कानाचा चावा घेऊन हिनाला गंभीर जखमी केले.

Story img Loader