मुंबई : बहुप्रसवी माध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या गदारोळात दैनंदिन घाडामोडींवर भाष्य, चर्चा आता सहज झाल्या. पण यापलीकडे बातमीतून ज्ञान आणि अचूक माहितीची कास धरत वाचकांना बौद्धिक-वैचारिक स्तरावर नेणाऱ्या सदरांची लयलूट नव्या वर्षांत ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानांतून तसेच पुरवण्यांमधून होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘संपादकीय’ आणि ‘विचार’ या पानांवर दरवर्षी जगण्याशी, भवतालाशी एकरूप असलेल्या वाचकस्नेही विषयांना स्थान असते. हा शिरस्ता यंदाही कायम आहे. भारतीय राज्यघटनेचे- अर्थात भारतीयांनी स्वत:स दिलेल्या संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष २६ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले. त्यानिमित्त २०२४ मध्ये दर सोमवार ते शुक्रवारी ‘संविधान-भान’ हे श्रीरंजन आवटे     यांचे नवे सदर (‘विचार’ पानावर) सुरू होणार आहे. तसेच संपादकीय पानावरील दर बुधवारचे लोकप्रिय असलेले ‘चतु:सूत्र’ हे सदरही संविधानाच्या चार विविध पैलूंना वाहिलेले असेल. चार जाणकारांनी दर तीन आठवडय़ांच्या खंडाने एक लेख लिहावा ही ‘चतु:सूत्र’ची मूळ कल्पनाही यंदा त्यामुळे अधिक सुसूत्र होते आहे. ‘संविधानसभेतील चर्चा’ या विषयावर संविधान संवर्धन समितीचे सुरेश सावंत, ‘संविधान आणि कायदे-न्यायपीठे’ या विषयावर अधिवक्ता प्रतीक राजुरकर, ‘संविधानाची सामाजिक वाटचाल’ या विषयावर राज्यशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राजेश्वरी देशपांडे, तर ‘संसद आणि संविधान’ या विषयावर कायदा क्षेत्रातील चार दशकांचा, तर संसद सदस्य म्हणूनही सुमारे दोन दशकांचा अनुभव असलेले अभिषेक मनु सिंघवी लिहिणार आहेत.

संगणकाच्या ‘चिप’चे कार्य, त्यातील प्रगती इथपासून ते ‘चिप’साठीच्या धातूंमुळे देशादेशांत निर्माण होणारे ताणतणाव यांची साद्यंत दखल घेणारे अमृतांशु नेरुरकर यांचे ‘चिप-चरित्र’ हे नवे सदर दर सोमवारी असेल, तर मराठी विज्ञान परिषदेचे ‘कुतूहल’ हे सदर यंदा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाला वाहिलेले असेल.

‘भूगोलाचा इतिहास’ हे एल. के. कुलकर्णी यांचे सदर दर शनिवारी भेटीला येईल. हे यंदाचे खास आकर्षण असेल. कुलकर्णी यांची ओळख मराठीतल्या एकमेव ‘भूगोलकोशा’चे कर्ते, अशी आहे. पण या सदरात भूगोलाची ‘कोषाबाहेरची’ ओळख ते करून देतील! याखेरीज दिल्लीतून देशाची दखल घेणारा ‘लालकिल्ला’ हा स्तंभ, गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे पाक्षिक सदर, सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन त्यांना हवा तसा मांडू देणारी ‘पहिली बाजू’, तर कुणालाही- कसेही हसरे चिमटे काढणारे ‘उलटा चष्मा’ आणि व्यक्तिमत्त्वांची औचित्यपूर्ण दखल घेणारे ‘व्यक्तिवेध’, ताज्या घडामोडींचा ‘अन्वयार्थ’ आणि या घडामोडींचे पैलू समजून घेणारे ‘विश्लेषण’ ही सदरे असतीलच. सद्य:स्थितीतील कलाजगताची दखल घेणारे अभिजीत ताम्हणे यांचे ‘कलाकारण’ हे पाक्षिक सदर यंदा सुरू होणार आहे, तर ‘चाँदनी चौकातून’- दिल्लीवाला आणि ‘समोरच्या बाकावरून’- पी. चिदम्बरम यंदाही लिहीत राहतील! इंग्रजी पुस्तकांची ओळख करून देणारे ‘बुकमार्क’ हे पानही यंदा वेगळय़ा स्वरूपात असेल.

पुरवण्यांमध्ये काय?

’‘लोकरंग’मध्ये ‘आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले’ सदरामधून या माध्यमातील महत्त्वाचे दिग्दर्शक लिहिणार आहेत. ‘ओटीटी’च्या माऱ्यामध्ये या माध्यमाची ताकद सांगणारे हे सदर असेल.

’त्याचबरोबर गीतकार, गायक, संगीतकार, अभिनेते अशा वैविध्यपूर्ण भूमिका सहज वठविणारे स्वानंद किरकिरे यांच्या इंदौरी भूमीतल्या आप्तांविषयीची व्यक्तिचित्रे यंदाचे खास आकर्षण असेल. रंगतदार बालमैफलही नव्या गोष्टींसह सादर होईल.

’चतुरंगमध्ये ‘भय’ या विषयावरील ललित लेखांची मेजवानी असेल. त्याचबरोबर देशविदेशातील स्त्री-विश्वाचा धांडोळा घेण्यात येईल.

’‘माझी मैत्रीण’ या सदरामध्ये नव्या कथात्मक-अकथात्मक साहित्यिकांचा समावेश असेल. ‘एकटे की एकाकी’ हे माणसाच्या सध्याच्या मानसिक दोलआंदोलनाचा आढावा घेणारे सदरही भेटीला येईल.

’अभिजात नाटकांवर विविध रंगकर्मी लिहिणार आहेत. तसेच ‘जिंकावे आणि जगावेही’ हे आंतरराष्ट्रीय कोच संकेत पै यांचे खास सदर असेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News author readable column in the editorial pages from news year in loksatta zws