मुंबई : अनेक गंभीर गुन्ह्यांत भारताला हवा असलेला कुविख्यात गुंड व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मृत्यूचे वृत्त पुन्हा एकदा झळकले आहे. अर्थात या वृत्ताला दुजोरा देणे पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या अडचणीचे आहे. पण या आधीही चार वेळा दाऊदच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलीस तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे १९८६ मध्ये दुबईला पळून गेलेला दाऊद दिसतो कसा, याचे छायाचित्र कदाचित केंद्रीय तपास यंत्रणेकडे असेल. परंतु मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाऊदचे अलीकडील छायाचित्र उपलब्ध नाही. दाऊदवरील गुन्ह्यांचे डॉसिअर वेळोवेळी केंद्रीय तपास यंत्रणेला मुंबई पोलिसांकडून सादर केले जाते. मुंबईत दाऊदच्या नावावर असंख्य गुन्हे आहेत. २०१८ पासून दाऊद गंभीर आजारी असून, त्याला उच्च मधुमेह आहे आणि त्याची फुप्फुसे निकामी झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचली होती. या यंत्रणेने दाऊदवर वेळोवेळी पाळत ठेवली. परंतु प्रत्यक्ष दाऊदला ठार मारणे यंत्रणेला शक्य झाले नाही. पंतप्रधानांचे प्रमुख सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे तेव्हा गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यावेळी त्यांनी छोटा राजनचा हस्तक विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांच्यावर दाऊदला संपविण्याची जबाबदारी सोपविली होती. परंतु त्याआधीच मुंबई पोलिसांनी दिल्लीत जाऊन या दोघांना अटक केली. मात्र त्यामुळे दाऊदला मारण्याचा कट उधळला गेला व मुंबई पोलिसांनी दाऊदची मदत केली, अशीही ओरड झाली. परंतु त्यात तथ्य नव्हते. खरेतर हे गैरसमजातून घडले होते, असे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तत्कालीन सहआयुक्त असलेल्या मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – मलबार हिल जलाशयाची तज्ज्ञांच्या समितीने केली पाहणी, दक्षिण मुंबईतील नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे

केंद्रीय तपास यंत्रणेनेही दाऊदला मारण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. दाऊदच्या एका भावाचे निधन झाले तेव्हा कराचीतील एका दर्ग्यात दाऊद गेला होता, त्यावेळी झालेल्या गोळीबारात दाऊद वाचला होता. हा हल्ला आपल्या केंद्रीय तपास यंत्रणांनी घडवून आणला होता, असे बोलले जाते. अर्थात अशा घटनांना अधिकृत दुजोरा मिळत नाही. छोटा राजनचा वापर करूनही आपल्या यंत्रणांनी दाऊदला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

दाऊदच्या मृत्यूची खबर २०१६ मध्येही अशीच बाहेर आली होती. दाऊदचा अतिउच्च मधुमेहामुळे गॅंगरिनचा आजार झाला असून त्याचा पाय कापावा लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. काही प्रतिष्ठित वृत्तवाहिन्यांनी ही खबर चालविली होती. परंतु नंतर दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलने एका इंग्रजी वृत्तपत्राला दाऊद जिवंत असून त्याची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले होते. २०१७ मध्येही दाऊदच्या मृत्यूचे वृत्त झळकले होते. हृदयविकाराच्या झटक्याने दाऊदचा कराची येथील आलिशान बंगल्यात मृत्यू झाल्याच्या वृत्ताचेही छोटा शकीलने खंडन केले होते. २०२० मध्ये दाऊद करोनाचा बळी पडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली. पण प्रत्यक्षात दाऊद नव्हे तर त्याचा पुतण्या सिराजचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – म्हाडातील १४०० कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच

दाऊदच्या मृत्यूच्या वार्ता वेळोवेळी पसरविल्या जातात, असेच आढळून आले आहे. दाऊद जिवंत आहे किंवा नाही, याची खबर फक्त केंद्रीय तपास यंत्रणेला आहे. दाऊद जिवंत आहे. मात्र तो गंभीर आजारी असून पाकिस्तानात आहे, असेच यापैकी एका सूत्राचे ठाम म्हणणे आहे. भारताला पाहिजे असलेल्या २२ गुंडांचा परदेशात खात्मा करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र राजनैतिकदृष्ट्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून तसा अधिकृत दावा केला जात नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: News of dawood ibrahim death surfaced again rumors of his death were spread four times before this mumbai print news ssb