विकासाच्या केवळ कल्पना न मांडता गेल्या पाच वर्षांत मुंबईत १५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण केले असून ४० हजार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी मुंबईचे शांघाय करणे अशक्य असल्याची स्पष्ट कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून गेल्या पाच वर्षांत राबविण्यात आलेल्या विकासकामांची सध्या जोरदार जाहिरातबाजी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्वत: शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत या विकास योजनांची पाहणी केली. त्यानंतर सह्य़ाद्री अतिथिगृहावर पत्रकारांशी बोलताना, शांघायमध्ये ज्याप्रमाणे विकास योजना राबिवण्यात आल्या तशा येथे राबविणे अशक्य असल्याने मुंबईचे शांघाय अशक्य असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, अतिरिक्त आयुक्त संजय सेठी व वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.
“शहरात एकच एजन्सी असावी, असे म्हणणाऱ्या मुंबई महापालिकेने आधी आपल्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे भरावेत. किनारी मार्ग मुंबई महापालिकेनेच करावा. मात्र त्यालाही पर्यावरणाची मान्यता मिळणे अवघड आहे.”
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
पाच वर्षांत हे करून दाखवले
*पूर्व मुक्त मार्ग
*वर्सोवा- घाटकोपर मेट्रो
*चेंबूर- वडाळा मोनोरेल
*सहार उन्नत मार्ग
*पूर्व- पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडणारे १२ मार्ग
*१७ उड्डाणपूल
*सांताक्रूझ-चेंबूर आणि जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्ते
राष्ट्रवादीला टोला
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अनेक प्रकल्प मान्यतेसाठी आणले जात असले तरी या प्रकल्पांसाठी निधी कुठून आणि कसा उभा करणार याचे ठोस उत्तर दिले जात नाही. त्यामुळेच या प्रकल्पांना मान्यता मिळालेली नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला.
मेट्रोच्या अडचणी
कारशेडच्या अडचणीमुळे दहिसर-मानखुर्द मेट्रो प्रकल्प रखडला असून तो होण्याबाबत साशंकता आहे. घाटकोपर-ठाणे मेट्रोचा प्रकल्प अहवाल नुकताच शासनास सादर झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.